लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनानंतर आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असताना, एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत निघणे अपेक्षित असताना, ठाण्यातील आठ आगारांत कार्यरत असलेल्या ३ हजार ४०० कर्मचाऱ्यांचा जुलै महिन्याचा पगार अद्यापही झाला नसल्याची बाब समोर आली आहे. लॉकडाऊन असताना कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळत होते. परंतु, आता परिस्थिती सुधारली असतानाही पगार न झाल्याने कर्मचारी मात्र चिंतेत दिसत आहेत. घर कसे चालवायचे, कर्जाचे हप्ते कसे भरायचे, असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागात ठाणे आगार १-२, कल्याण, विठ्ठलवाडी, मुरबाड, शहापूर, भिवंडी आणि बोरीवली असे आगार आहेत. दिवसाला ५५० गाड्यांची या आगारातून राज्यभर वर्दळ सुरू असते. दिवसाला या गाड्या अंदाजे एक लाख ५८ हजार किलोमीटरचा प्रवास करतात. पहिल्या लॉकडाऊनला प्रवासी संख्या घटण्यास सुरुवात झाली. त्यानंतर दुसऱ्या लॉकडाऊननंतर एसटीच्या उत्पन्नावर कुऱ्हाडच कोसळल्याचे दिसून आले. दरम्यान, आता अनलॉक झाल्यानंतरही एसटीवर फारसा परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. एसटीच्या या आठ आगारांत सध्या ३ हजार ४०० कर्मचारी कामावर रुजू आहेत. परंतु, जुलै महिन्याचा पगार अद्यापही कर्मचाऱ्यांच्या हाती पडलेला नाही. मागील काही महिन्यांपासून तो उशिरानेच हाती पडत आहे. मागील काही महिने १५ तारखेनंतर पगार हाती पडत होता. परंतु, आता जुलै महिन्याचा पगार १५ तारीख उलटूनही झाला नसल्याने कर्मचारी चिंतेत आहेत. त्यातही ज्या वेळेस या बसेस पूर्ण क्षमतेने रस्त्यावर धावत होत्या, त्यावेळेस एसटीला ६२ लाखांच्या आसपास उत्पन्न मिळत होते. परंतु, कोरोनामुळे हे उत्पन्न हे ५५ लाखांनी खाली आले होते. सध्या परिस्थिती पूर्वपदावर येत असून, एसटीच्या उत्पन्नातही वाढ होऊ लागली आहे. असे असले तरी, एसटीचा रोजचा खर्च हा उत्पन्नापेक्षाही अधिक असल्याचेही दिसून येत आहे. उत्पन्न कमी येत असल्याने दुरुस्तीचे साहित्य घेण्यासही एसटीकडे निधी नसल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात आगार - ८
अधिकारी - २५
कर्मचारी - ३४००
बसचालक -१४००
वाहक - ७००
उत्पन्न कमी आणि खर्च अधिक
एसटीचे उत्पन्न कमी असून, इतर खर्च हा अधिक आहे. इंधन खरेदीसह बस दुरुस्तीवर कोट्यवधींचा खर्च होत आहे. एसटीचा एका किलोमीटरसाठी ५८ रुपयांच्या आसपास खर्च आहे, तर उत्पन्न मात्र एका किलोमीटरसाठी ३१ रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्च हा अधिक आहे. त्यामुळे हा ताळमेळ बसविताना एसटीची तारेवरची कसरत होत आहे.
उसनवारी तरी किती करायची
आधीच आमचा पगार कमी आहे. पगार कमी असल्याने काही खर्च हे कर्ज काढून केले जात आहेत. परंतु, पगारच उशिराने होत असल्याने घराचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यात आधी घेतलेले कर्ज फेडले जात नसल्याने पुन्हा नव्याने कर्ज कसे घ्यायचे, असा प्रश्न आमच्यापुढे आहे.
(एसटी कर्मचारी)
...........
उशिराने होणाऱ्या पगारामुळे घरचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. जुलै महिन्याचा पगार अद्यापही झालेला नाही. तो होणार की नाही, हे समजत नाही. आणखी कोणाकडून कसे पैसे उसने घ्यायचे, असा प्रश्न सतावत आहे.
(एसटी कर्मचारी )
......
एसटीचे उत्पन्न कमी आणि खर्च हा अधिकचा आहे. कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. पगार लवकरच होतील.
(विनोदकुमार भालेराव - विभागीय नियंत्रक, ठाणे एसटी)