पंकज पाटील, बदलापूर: बदलापूरचा होम प्लॅटफॉर्मचे काम रेंगाळत सुरू असताना आता बदलापुरातील फलाट क्रमांक एक वरून मुंबईच्या दिशेकडे जाणारी लोकल पकडणे प्रवाशांसाठी बंद करण्यात येणार आहे. बदलापूरहुन सुटणारी मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल आता होम प्लॅटफॉर्मवरूनच पकडावे लागणार असल्याने बदलापूर पूर्व भागात राहणाऱ्या प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.
बदलापूर रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात सुविधा पुरविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे होम प्लॅटफॉर्मचे काम देखील 95 टक्के पूर्ण झाले असून काही ओघम कामे अंतिम टप्प्यात आहेत. होम प्लॅटफॉर्म प्रवाशांसाठी खुले होणार याचा आनंद प्रवाशांना असतानाच आता रेल्वेने बदलापूरच्या प्रवाशांना चांगलाच झटका दिला आहे. काही तांत्रिक कामानिमित्त होम प्लॅटफॉर्म सुरू झाल्यावर लागलीच फलाट क्रमांक एक हा प्रवाशांना बंद करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर बॅरिगेटिंग करण्याचे काम देखील सुरू करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने एका आदेशावर 30 जानेवारीपासून बॅरिकेटिंग साठी पाया उभारणीचे काम सुरू केले आहे. त्यामुळे होम प्लॅटफॉर्म सुरू झाल्यानंतर बदलापूरचे फलाट क्रमांक एक हे प्रवाशांसाठी कायमचे बंद होणार आहे.
प्रवाशांना नेमका त्रास काय होणार :
होम प्लॅटफॉर्मवरच बदलापूरची लोकल येणार असल्याने सर्व प्रवाशांना त्याच एका प्लॅटफॉर्मवर उतरावं लागणार आहे. त्यामुळे पश्चिम भागातील प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. मात्र पूर्व भागात जाणाऱ्या प्रवाशांना मोठी अडचण निर्माण झाली आहे.
बदलापूर पूर्व भागातून लोकल पकडण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांना बदलापूरहून लोकल पकडताना होम प्लॅटफॉर्मवर यावे लागणार आहे. मात्र होम प्लॅटफॉर्मपर्यंत येण्याचा मार्ग पूर्व भागातील प्रवाशांसाठी अडचणीचा मार्ग ठरत आहे.
गर्दीच्या वेळेस अनेक प्रवासी फलाट क्रमांक एक वर उतरून त्या ठिकाणी असलेल्या पादचारी पुलावरून पूर्व भागात जात होते मात्र आता तो मार्ग बंद होणार असल्यामुळे होम प्लॅटफॉर्मवरून उपलब्ध करून देण्यात आलेल्या एकमेव मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
फलाट क्रमांक दोन वरून आता कर्जत दिशेकडे जाणाऱ्याच गाड्या सोडल्या जाणार आहेत. त्यामुळे मुंबईहून बदलापूरला आलेल्या प्रवाशांना त्या ठिकाणी उतरण्यासाठी सोय झाली असली तरी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचे मात्र हाल होणार आहे.