उल्हासनगर - व्याजाच्या त्रासाला कंटाळलेल्या सुनील मोटवानी हे बेपत्ता झाल्याचा प्रकार उघड झाला असून त्याने लिहलेली पठाणी व्याजाची चिट्ठी कुटुंबाने हिललाईन पोलिसांना दिली. यापूर्वी पठाणी व्याजातून गिरीश चुग यांनी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून आत्महत्या केली. तर रोहिना अन्सारी यामहिलेने फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रकार झाला आहे. पठाणी व्याजाच्या व्यवहारावर अंकुश घालण्यात पोलीस प्रशासनाला अपयश आल्याची टिका होत आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-५ परिसरात सुनील मोटवानी हे कुटुंबासह राहत असून २२ फेब्रुवारी पासून बेपत्ता असल्याचा गुन्हा हिललाईन पोलीस ठाण्यात दाखल झाला. सुनील हा पठाणी व्याजातून बेपत्ता झाला असून त्याच्या जीवाला धोका असल्याचा आरोप मोठा भाऊ प्रेमप्रकाश मोटवानी यांनी केल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकाराने पठाणी व्याजाची चर्चा शहरात पुन्हा सुरू झाली. दोन महिन्यांपूर्वी गिरीश चुग या इसमाने सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करून आत्महत्या केल्याचा प्रकार झाला होता. चुग यांनी पठाणी व्याजखोरावर कारवाई करण्याची मागणी केली होती. घरात एकटाच कमावता असणाऱ्या गिरीश चुग यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले व वृद्ध आई-वडील आहेत.
दुसऱ्या प्रकारात कॅम्प नं-१ परिसरात राहणाऱ्या रोहिना अन्सारी यांनी पठाणी व्याजातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पती घरी येऊन त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेल्याने, जीव वाचला. त्यांनीही पठाणी व्याजखोरांच्या आतंकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याने, खळबळ उडून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शहरातून झाली होती. सुनील मोटवानी यांनी लिहिलेल्या चिट्टीत काही जणांकडून व्याजाने पैसे घेतल्याचे नमूद आहे. मात्र पठाणी व्याजातून त्रस्त असल्याचे त्यांनी चिट्टीत म्हटले आहे. कुटुंबाने चिट्टी पोलिसांना देऊन सुनील मोटवानी याचा शोध घेण्याची विनंती केली. तसेच भाऊ प्रमेप्रकाश मोटवानी यांनी भावाच्या जीवाला धोका असल्याची भीती पत्रकारां सोबत बोलताना दिली. याबाबत हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित ढेरे यांच्या सोबत संपर्क केला असता, होऊ शकला नाही.
पोलीस ठाण्यापर्यंत प्रकार जात नाही?
पठाणी व्याजाचा विळखा अनेकांच्या गळ्या भोवती पडला असून भीतीपोटी कोणी समोर येत नाही. अथवा पोलीस ठाण्या पर्यंत जाऊ दिले जात नसल्याचे बोलले जाते.