नितिन पंडीत
भिवंडी - भिवंडी शहरातील आजमी नगर , टिपू सुलतान चौक परिसरात असलेली एक मजली इमारत कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत एक जणाचा मृत्यू तर आठ जण जखमी झाले आहेत. रजाक ( वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष ) असे दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. तर हसीम शेख ३५, सुबेदा खातून ३५ , अमिना अन्सारी ४५ , रोशन बानो ३०, जारा कलाम १२, रोजी फातिमा १४, जिकरा अन्सारी १४ अशी जखमींचीनावे आहेत.
शहरातील आजमी नगर टिपू सुलतान चौक परिसरात शब्बीर अंसारी यांचे राहते घर होते. मार्केट परिसरात असलेल्या या घराच्या आजू बाजूला शब्बीर यांनी घराच्या गेलेरिवर वाढीव अधिकृत बांधकाम केले होते. या इमारतीच्या खाली किराणा दुकान तसेच इतर दुकाने होती. मार्केट परिसर व दुकाने असल्याने याठिकाणी नागरिक खरेदीसाठी आले होते. त्यावेळी वाढीव गेलेरी व घराचा भाग खरेदी साठी आलेल्या नागरिकांवर कोसळल्याने या दुर्घटनेत एक जण मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत.
विशेष म्हणजे या दुर्घटनेत घरातील कोणीही जखमी झाके नसून मार्केट व दुकानात खरेदीसाठी आलेले नागरिक व महिला दुर्घटनेत मयत व जखमी झाले आहेत. जखमींना शहरातील स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये तिघांची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी अग्निशमन दल , पोलीस व आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक दाखल होत मदत कार्य सुरू होते. भोईवाडा पोलीस ठाण्यात या दुर्घटनेची नोंद करण्यात आली आहे.