नितिन पंडीत
भिवंडी - भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील एका कौलारू एक मजली घरास आग लागल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. या आगीत संपूर्ण घर जाळून खाक झाले असून लाखो रुपयांचे साहित्याचे नुकसान झाले आहे .
वळ गावातील श्याम भोईर ,जनार्दन भोईर ,निराबाई भोईर व कैलास भोईर यांचे सामायिक एक मजली कौलारू घर असून शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास वरच्या मजला वर शॉर्ट सर्किट ने अचानक आग लागली व पाहता पाहता ही आग संपूर्ण घरात पसरली .
कैलास भोईर यांच्या दोन मुलांचे नुकताच लग्न झाले असून त्या लग्नात मिळालेले आहेराचे साहित्यसह एसी यंत्र ठेवले होते. त्यांनी देखील पेट घेतल्याने कॉम्प्रेसर मधील गॅस चा स्फोट होऊन संपूर्ण सिलिंग व कौलारू छत कोसळले.आगीची माहिती कळताच स्थानिक पंचायत समिती सदस्य विकास भोईर यांनी नारपोली पोलिसांसह अग्निशामक दलास पाचारण केले व त्यानंतर तब्बल एक तासाने अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले तत्पूर्वी सरपंच राम भोईर ,पोलीस पाटील गिरीधर पाटील यांसह अनेक ग्रामस्थ युवक यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला . परंतु तो पर्यंत संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते .या घटनेची नोंद नारपोली पोलिसांनी केली असून मौजे पूर्णा चे तलाठी सुधाकर कामठी यांनी आगीतील नुकसानीचा पंचनामा केला आहे .दरम्यान या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे .