मीरा रोड : लांबलेला पावसाळा व वादळामुळे आधीच मच्छीमारांचा मासेमारी हंगाम कमी झाला असताना, १० मार्च ते ५ मे असे तब्बल दोन महिने ओएनजीसीने समुद्रात तेल सर्वेक्षण करण्याचा कार्यक्रम जाहीर करून मासेमारी बोटींना सर्वेक्षण क्षेत्रापासून लांब राहण्याचा इशारा दिला आहे. जूनपासून मासेमारी बंद होत असल्याने हाती असलेले हंगामाचे दोन महिनेसुद्धा हातचे जाणार असल्याने मच्छीमारांमध्ये असंतोषाचा भडका उडण्याची चिन्हे दिसत आहेत.
ओएनजीसीकडून डहाणूपासून ३८ तर मुंबईपासून ६० नॉटिकल मैल अंतरावर तेल सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी एक जहाज तब्बल आठ हजार मीटर लांबीच्या केबल खेचत समुद्रात पाच नॉटिकल मैल वेगाने २४ तास धावत राहणार आहे. या जहाजाच्या आजूबाजूला संरक्षणासाठी एक जहाज व तब्बल ३० कोस्टगार्डच्या बोटी तैनात असणार आहेत, जेणेकरून तेल सर्वेक्षण करणाऱ्या जहाज व केबलमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा वा मासेमारी बोट येऊ नये, याची खबरदारी घेतली जाणार आहे.
ओएनजीसीच्या ऐन मासेमारी हंगामातील सर्वेक्षणास या आधीदेखील मच्छीमारांनी मोठा विरोध केला होता. भरसमुद्रात तसेच किनाºयावरसुद्धा आंदोलन, मोर्चा आदी मार्गाने सर्वेक्षण बंद पाडले होते. मच्छीमारांच्या शिष्टमंडळाशी प्रशासन व शासनस्तरावरदेखील बैठका झाल्या. त्यात मच्छीमारांनी नुकसानभरपाईची केलेली मागणी अजूनही ओएनजीसीने मान्य केलेली नाही. गेल्यावर्षी पावसाळा लांबला तसेच समुद्रात अनेकवेळा वादळामुळे मासेमारी बंद ठेवावी लागली. मासेमारीचा हंगाम आधीच हातचा गेला असून, त्यात मासेदेखील मिळत नसल्याने मच्छीमार हवालदिल झाले आहेत.