पंकज पाटील अंबरनाथ : कांद्याचे भाव वाढलेले असताना आता हॉटेलमधून कांदाभजी आणि कांद्याचे पदार्थ हद्दपार झाले आहेत. एवढेच नव्हे तर जेवणावर वाढण्यात येणारे कांदे काढून त्याठिकाणी कोबी देण्याचा प्रकार वाढला आहे. वाढलेल्या कांद्याच्या भावामुळे ग्राहकांना कांदाभजी किंवा कांद्याचे पदार्थ देणे महाग पडत असल्याने हॉटेलचालकांनी हा निर्णय घेतला आहे.कांद्याचे भाव ८० ते १०० रु पये किलोवर गेल्याने आता अनेक हॉटेलमधून कांदाभजी हद्दपार झाली आहे. कांदाभजी ही तिप्पट किमतीने विकली तरी हॉटेलमालकांना नुकसान सहन करावे लागणार असल्याने कांदाभजी विकण्याऐवजी मेनूकार्डमधून कांदाभजी काढून टाकण्याचा पर्याय हॉटेलमालकांनी निवडला आहे. काही हॉटेलमध्ये ३० रु पये प्लेट मिळणारी कांदाभजी ८० रु पये प्लेट या दराने विकण्याचा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. एवढी महाग कांदाभजी कोणीच घेत नसल्याने आॅर्डरप्रमाणे ग्राहकांना कांदाभजीची किंमत सांगूनच ती बनवून दिली जात आहे. काही हॉटेलमालकांना थेट बाजारपेठेतून जो स्वस्त कांदा मिळत होता, तो दरही ७० रु पयांवर गेल्याने हॉटेलमधील अनेक पदार्थ कमी कांद्यावर बनवण्याचा प्रकार सुरू करण्यात आला आहे. तर, कोशिंबिरीमधील लागणारा कांदा काढून त्या ठिकाणी कोबी टाकण्यात येत आहे. रस्त्यावर स्वस्तात विकण्यात येणारी कांदाभजी हीदेखील बंद झाली आहे. अनेक ठिकाणी कांद्याऐवजी कोबी चिरून त्याची भजी म्हणून विक्री केली जात आहे. बड्या हॉटेलचालकांनी आपल्या हॉटेलचा दर्जा कायम राहावा, यासाठी कांदा देणे बंधनकारक केले असले तरी त्याचे प्रमाण घटवण्यात आले आहे. लहान हॉटेलपासून मोठ्या हॉटेलचालकांपर्यंत सर्वांनाच वाढलेल्या कांद्याच्या दरामुळे फटका बसत असल्याचे हॉटेलचालक सांगत आहेत.।कोबीचा पर्यायशाकाहारी किंवा मांसाहारी बिर्याणीमध्ये कांदा हा अत्यावश्यक बाब असल्याने त्याठिकाणी कांदा वापरला जाईल, अशी ग्राहकांची समजूत आहे. त्यातही कांद्याऐवजी कोबीचा वापर वाढवण्यात आला आहे. बिर्याणीसोबत दिली जाणारी कोशिंबीरही कांद्याऐवजी कोबी चिरून देण्यात येत आहे. अनेक ठिकाणी सरसकटपणे कांद्याऐवजी कोबी वापरण्याचा प्रकार हॉटेलमालकांनी सुरू केला आहे. जेवणाचा पदार्थ देण्याआधी टेबलवर कांदा आणि लिंबू देण्यात येत होते, त्यातील फक्त लिंबूच ग्राहकांच्या ताटात येत आहे.
हॉटेल व्यावसायिकांकडून कांदाभजी हद्दपार, ऑर्डर दिल्यास ८० रुपये प्लेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 12:34 AM