ठाणे : स्वयंपाकघरातील अविभाज्य भाग असलेला कांदा आता थेट शंभरीच्या उंबरठ्यावर आला आहे. या आठवड्यात कांद्याचे दर गगनाला भिडले असून लवकरच कांदा भजी, मिसळ पाव, भेळ यांसारख्या चटपटीत पदार्थांबरोबरच संपूर्ण स्वयंपाकघरातूनच कांदा गायब होतो की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या आठवड्यात ७० ते ८० रुपयांपर्यंत मिळणारा कांदा आता ८० ते १०० रुपयांच्या घरात पोहोचला आहे.
एकीकडे महागलेल्या भाज्या आणि दुसरीकडे कांद्याच्या किमतीत झालेली भरमसाट वाढ यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडलेले आहे.
साहजिकच या दरवाढीमुळे कांद्याच्या खरेदी-विक्रीवरही परिणाम झाल्याचे कांदा व्यापारी संदीप चौधरी यांनी सांगितले.
पावसाने कांद्याचे नुकसान झाल्याने नवीन कांदा बाजारात आलेला नाही. जुना कांदा मात्र जवळपास संपला आहे.