ठाणे : कांद्याच्या दरात हळूहळू घसरण होत आहे. आठवडाभरापूर्वी १६० रुपये किलो दराने मिळणारा जुना कांदा आता १४० रुपये किलोवर तर १२० रुपये दराने मिळणारा कांदा शंभरीवर आला आहे. काही दिवसांत शंभरीच्या आत कांद्याचे दर येण्याची शक्यता कांद्याच्या व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
कांद्याचे ठाण्याच्या बाजारपेठेत आठवड्याभरापूर्वी भाव गगनाला भिडले होते. अलिकडे किरकोळ बाजारात जुना कांदा १६० रुपये किलो, होलसेल बाजारात १२० ते १४० रुपये किलो तर नवा कांदा किरकोळ बाजारात १०० ते १२० रुपये किलो, होलसेल बाजारात ८० ते १०० रुपये किलो दराने मिळत होता. परंतु, किलोमागे २० रुपये दराने कांद्याच्या दरात घसरण झाली असून संपत आलेला जुना कांदा किरकोळ बाजारात १२० ते १४० रुपये किलो तर होलसेल बाजारात १०० ते १२० रुपये किलो तसेच, नविन कांदा किरकोळ बाजारात ८० ते १०० रुपये किलो तर होलसेल बाजारात ७० ते ९० रुपये दराने मिळत आहे.
तुर्तास सामान्य ग्राहकांकडून मोजकीच खरेदी होत आहे. जेव्हा दर ७० - ८० रुपयावर येतील, तेव्हा कुठे एक - दोन किलोंवर खरेदी जाईल असे कांदा - बटाट्याचे व्यापारी संदीप चौधरी यांनी सांगितले. दरवाढीमुळे कांदा विक्री दररोज एक टन ऐवजी २५० किलोच होत असल्याचे निरीक्षण चौधरी यांनी नोंदविले. कांद्याच्या दरात घसरण होत असून हळूहळू हे दर कमी होतील अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. नविन कांद्याची आवक वाढल्यामुळे दर कमी होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.