ठाणे : कांद्याची टंचाई निर्माण झाल्याने त्याचे दरही लगेच तितकेच गगनाला भिडले. त्यातून कांद्याचा साठेबाजार होण्याची शक्यता असल्याने शिधावाटप विभागाने घाऊकसह किरकोळ व्यापाऱ्यांवर नजर ठेवण्यास सुुरुवात केली आहे. त्यानुसार शिधावाटप विभागाने ठाणे, भिवंडी, नवी मुंबई, कल्याण आदी ३१ ठिकाणी तपासणी केली.
आतापर्यंतच्या तपासणीत कुठेही कांद्यांची साठवणूक झाली नसल्याचे समोर आले नाही. त्यामुळे ही तपासणी पुढील सूचना येईपर्यंत अशीच सुरू राहिल,अशी माहिती सूत्रांनी दिली. अशाप्रकारे या विभागामार्फत तपासणी करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात आले आहे.
जीवनाश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाल्यावर त्या पदार्थाची साठवणूक होण्याची शक्यता निर्माण केली जाते. त्यानुसार केंद्र शासनाने ३ डिसेंबर रोजी एक अधिसूचना जाहिर केली आहे. यामध्ये घाऊक विक्रेत्यांना २५ मेट्रिक टन तर किरकोळ विक्रेत्यांना ५ मेट्रिक टन साठवून करण्याची परवानगी दिली आहे. तत्पूर्वी म्हणजे २९ सप्टेंबर २०१९ च्या केंद्राच्या अधिसूचनेनुसार घाऊक विक्रेत्यांना ५० क्विंटलतर किरकोळ विक्रेत्यांना १० क्विंटल साठवून करण्याची परवानगी देण्यात आली होती.
३ डिसेंबरच्या अधिसूचनेमध्ये घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांनी कुठे कांदा साठवून ठेवला आहे का? याची पाहणी करण्याचे आदेश शिधावाटप विभागाला दिले गेले. ते आदेश ५ डिसेंबरला आल्याने तातडीने तीन पथक तयार करू त्यामार्फत त्याच दिवसापासून तपासणीला सुरुवात केली आहे. त्यानुसार आतापर्यत नवी मुंबई, कल्याण आणि भिवंडी येथील बाजार समितींसह ठाणे,डोंबिवली, भार्इंदर, बदलापूर आदी परिसरात तपासणी केली. यादरम्यान कुठेही साठवणूक केल्याचा प्रकार पुढे आलेला नाही. मात्र, ही तपासणी पुढील अधिसूचना येईलपर्यंत अशीच सुरू ठेवण्यात येणार आहे.
...तर साठा तत्काळ जप्तसाठ्याची तपासणी करताना त्या विक्रेत्यांच्या रजिस्टरवरील खरेदी-विक्रीची पाहणी केली जात आहे. जर एखाद्या ठिकाणी साठा अधिसूचनेपेक्षा अधिक प्रमाणात निदर्शनास आल्यास तो तातडीने जप्त केला जाईल, असे ही संबंधित विभागामार्फत सांगण्यात आले आहे.