ठाणे : गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणणारा कांदा आता शंभरीच्या उंबरठ्यावर आला आहे. त्यापाठोपाठ बटाट्यानेही उच्चांक गाठला आहे. कोरोनाने अगोदरच खिशाला कात्री लावलेली असताना कांदा, बटाट्याच्या वाढलेल्या दराने कंबरडे मोडले असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून उमटत आहे.
गेल्या काही दिवसांपासून कांद्यांचे दर वाढतच आहेत. पाहतापाहता कांदा शंभरीच्या उंबरठ्यावर आला आहे. कांद्यापाठोपाठ बटाटाही महाग होत चालला आहे. रोजच्या जेवणात कांदा हा अविभाज्य घटक असून, बटाट्यालाही नेहमीच मागणी जास्त असतो. मात्र या वाढलेल्या भावाने सर्वसामान्यांच्या डोळ्यांत अश्रू आणले आहेत. अहमदनगर, पुणे, नाशिक येथून कांद्यांची आवक होते. जुना कांदा संपत आल्याने माल कमी पडत आहे. त्यामुळे जुन्या कांद्याची आवक मंदावली आहे. पावसामुळे नवीन कांदा येत नाही आणि पिकेही लांबण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पुढे कांदा शंभरीच्या वर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे कांदा, बटाट्याचे व्यापारी संदीप चौधरी यांनी सांगितले.
बटाट्याची सर्वाधिक आवक ही उत्तरप्रदेशमधून होते. गेल्यावर्षी त्या ठिकाणी बटाट्याचे अपेक्षित उत्पादन न झाल्याने त्याचा परिणाम यावर्षीच्या आवकवर होत आहे. या महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये बटाट्याची लागवड केली जात आहे.त्यामुळे लागवडीसाठीही बटाटा लागत आहे. या आणि इतर कारणांमुळे मागणीच्या तुलनेत बटाट्याचा माल येणे कमी झाल्यामुळे भाव वाढले आहेत. सर्वसाधारण बटाटा २५ ते ३० रुपये किलोप्रमाणे विकला जातो. परंतु, यंदा ५० वर येऊन पोहोचला असल्याचे चौधरी यांनी सांगितले.