सदानंद नाईक, उल्हासनगर : महापालिकेच्या पाणी पुरवठा वितरण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमीपूजन शुक्रवारी सकाळी ११ वाजता गोलमैदान योगाकेंद्र येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन झाले. यावेळी आमदार कुमार आयलानी, महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
उल्हासनगर महापालिकेला केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत ४०० कोटींची पाणी पुरवठा वितरण योजना राबविली असून जुन्या जलवाहिनीच्या जागी नवीन जवाहिन्या टाकून १ भूमिगत जलकुंभासह ११ उंच जलकुंभ उभारण्यात आले. तसेच ५५ हजार पाणी मिटरसह पंपिंग स्टेशन उभारले. मात्र झोपडपट्टी परिसरात जलवाहिन्या टाकण्यात न आल्याने, योजना अपूर्ण राहिली होती. योजना पूर्ण करण्यासाठी महापालिकेने केंद्राकडे पाठपुरावा केल्यावर केंद्राच्या अमृत योजने अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील २२६ कोटीच्या योजनेला मंजूर मिळाली. त्या योजनेचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी ऑनलाईन झाले.
दुसऱ्या टप्प्यातील २२६ कोटीच्या पुरवठा वितरण योजने अंतर्गत जुन्या जलवाहिनीच्या ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकणे, ४ नवीन जलकुंभ उभारणे, घरोघरी पाणी मीटर जोडणी आदी कामे केली जाणार असल्याची माहिती भूमिपूजन झाल्यानंतर महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी दिली. दुसऱ्या टप्प्यातील योजना पूर्ण झाल्यावर शहरातील पाणी टंचाई निकाली निघणार असल्याची माहिती आयुक्त शेख यांनी दिली आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा वितरण योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमाला आमदार कुमार आयलानी महापालिका आयुक्त अजीज शेख.
भाजपा जिल्हाअध्यक्ष प्रदीप रामचंदानी, जमनूदास पुरस्वानी, शिवसेना शहरप्रमुख भुल्लर महाराज, अरुण आशान, लाल पंजाबी, राम चार्ली पारवानी, मंगला चांडा, डॉ एस बी सिंग, अर्चना करनकाळे, लक्की नाथानी, दिनेश पंजाबी आदी सह महापालिका अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित रहे*