अंबरनाथ : भारतामध्ये आॅनलाइन मार्केटिंग कंपनी सुरू करत असून त्यात पैसे गुंतवल्यास दोन वर्षांत दुप्पट नफा मिळेल, असे आश्वासन देऊन २१ लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंबरनाथचा रहिवासी असलेला गिरीश नायर हा २० ते २५ वर्षे दुबईमध्ये पत्नीसह राहत आहे. दुबईमध्ये आॅनलाइन मार्केटिंगचे काम करतो. गिरीश याची आई आणि सासू, सासरे अंबरनाथलाच राहतात. त्यामुळे त्याचे अंबरनाथला येणेजाणे आहे. मार्च २०१७ मध्ये गिरीश अंबरनाथला आला असता त्याने भारतात आॅनलाइन मार्केटिंग कंपनी सुरू करणार असल्याचे मनीषा रोठे यांचा मुलगा प्रतीक याला सांगितले. त्यानंतर प्रतीकने याबाबत आई मनीषा यांना माहिती दिली. कंपनी आणि त्यातील गुंतवणुकीविषयी माहिती घेण्यासाठी प्रतीक आणि त्याची आई हे गिरीशच्या घरी गेले. तेव्हा गिरीशने व्हिस्टा ईगल ग्लोबल या आॅनलाइन मार्केटिंग कंपनीबाबत माहिती दिली. या कंपनीत गुंतवणूक केल्यास दोन वर्षांत गुंतवलेली रक्कम दुप्पट होईल, असे आमिष दाखवले. सोबत कंपनीतील नफ्यातून एक टक्का रक्कम मिळेल, असे सांगितले. गिरीश याने त्या कंपनीत मनीषा यांना २५ लाख गुंतवण्यास सांगितले. मात्र, मनीषा यांनी २१ लाख गुंतवण्याची तयारी दर्शवली. कंपनीत जे पैसे गुंतवणे अपेक्षित होते त्या कंपनीच्या नावाने धनादेश देण्यास मनीषा तयार झाल्या.सुरुवातीपासून फसवणुकीच्या तयारीत असलेल्या नायर याने ते धनादेश त्याची आई नागलक्ष्मी नायर आणि सासरे रमेश सारडा यांच्या नावाने देण्यास सांगितले. त्यानुसार मनीषा यांनी ९ लाख, नंतर ७ लाख आणि त्यापाठोपाठ ५ लाख असे एकूण २१ लाख दिले. मात्र, वर्ष उलटूनही कंपनीचा कोणताच पत्ता नसल्याने मनीषा यांनी नायर यांना विचारणा केली. मात्र, त्यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया मिळाली नाही. अखेर मनीषा यांनी कंपनीची वेबसाइट पाहिली असता त्यात संचालक म्हणून भलतीच नावे आढळली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर मनीषा यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. २३ मे रोजी तक्रार दिल्यावर आरोपी नायर याने त्याच्या ओळखीतील काही व्यक्तींना मध्यस्थी करत पैसे परत देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार बैठक झाल्यावर पैसे परत मिळतील, या आशेवर तक्रार मागे घेतली. मात्र, समझोता झाल्यावर दिलेला धनादेश बँकेत वठलाच नाही. त्यामुळे मनीषा यांनी गिरीश नायर, त्याची पत्नी शीतल नायर, आई नागलक्ष्मी नायर आणि सासरे रमेश सारडा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.>सर्व आरोपी गायबगुन्हा दाखल झाल्यापासून चारही आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडलेले नाहीत. तर, गिरीश हा परदेशात पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अन्य आरोपींना अटक करून या प्रकरणाचा तपास करण्याचे पोलिसांचे प्रयत्न आहेत.
आॅनलाइन कंपनीने महिलेला घातला २१ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 2:30 AM