लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुंबई, ठाणे या महानगरांमधील शैक्षणिक संस्थांचा गोरखधंदा झाला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील दोन हजार ९४८ माध्यमिक व प्राथमिक शाळा सध्या ऑनलाइन धडे देत आहेत. या शाळांमधील जवळजवळ चार लाख विद्यार्थ्यांकडे मोबाइल आहे. मात्र, २१ हजार विद्यार्थ्यांकडे टीव्ही, रेडिओ, मोबाइल या कोणत्याच सुविधा नाही. यावरून या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सध्या रामभरोसे असल्याचे गंभीर वास्तव जिल्ह्यात आहे. सध्या जिल्ह्यातील काही शाळांमध्ये ऑफलाइन ''शिक्षणसेतू'' हा उपक्रम हाती घेऊन विद्यार्थ्यांना शिकवले जात असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.
इंटरनेटचा वापर हा ठाणे, मुंबईत ही सध्याची क्षुल्लक बाब झाली आहे. त्यामुळे या परिसरातील शाळांसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन धडे देणे सोयीस्कर झाले आहे. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यासाठी या शिक्षणावर भर दिला जात आहे. विद्यार्थी घरात बसून ऑनलाइन धडे घेत आहेत. त्यासाठीही अव्वाच्या सव्वा शुल्क शाळांकडून आकारले जात आहे. शैक्षणिक शुल्काची ही बाब न्यायप्रविष्ट असून न्यायदेवतेने या शाळांना कानपिचक्याही दिल्या आहेत.
जिल्ह्यातील एक हजार ६२० माध्यमिक शाळांमध्ये आठ लाख २५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. माध्यमिक शिक्षण विभागाने या त्यांच्या एक हजार ६२० शाळांमधील विद्यार्थ्यांचा सर्व्हे केला होता. त्यात सव्वाआठ लाख विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे उघड झाले. यामध्ये सहा लाख विद्यार्थ्यांकडे टीव्ही आहे. चार लाख विद्यार्थ्यांकडे मोबाइल व टीव्ही आहे. यासह रेडिओ असलेले दोन लाख विद्यार्थी जिल्ह्यात आढळलेले आहे. यामध्ये मात्र २१ हजार विद्यार्थी असे आहे की, त्यांच्याकडे रेडिओ, टीव्ही आणि मोबाइलही नाही. त्यामुळे लॅपटॉप, टॅब आदी तर त्यांच्यासाठी फारच लांब आहे. अशा या विद्यार्थ्यांचे कोरोनाच्या या कालावधीतील ऑनलाइन शिक्षण हेही एक स्वप्नच असल्याचे दिसून येत आहे.
ठाणे महापालिकेसह नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर या सहा महापालिकांसह जिल्हा परिषदेच्या व नगर परिषदांच्या कार्यक्षेत्रात अनुदानित ४३४ माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांसह अंशत: अनुदानित, विनाअनुदानित आदी एक हजार ६२० हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालये जिल्ह्यात कार्यरत आहेत. जिल्ह्यातील या शाळांमध्ये सात हजार ७३७ शिक्षक व १६ हजार ४९० शिक्षिकांसह तब्बल २४ हजार २२७ शिक्षक कार्यरत आहेत. याशिवाय, आठ हजार ९१ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्हाभरातील या ३२ हजार ३१८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून ९ वी ते १२ वीच्या चार लाख ४२ हजार ५०७ विद्यार्थ्यांना या एक हजार ६२० हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यादानाचे कार्य सध्या सुरू आहे.
---