लोकमत न्यूज नेटवर्क
स्नेहा पावसकर
ठाणे : सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचाच आधार घ्यावा लागत आहे. प्रत्यक्ष शाळा नसली तरी अनेक शाळा मात्र पालकांकडून पूर्ण फी वसूल करीत आहेत आणि आता ऑनलाइन शिक्षणामुळे पालकांना आपल्या पाल्यासाठी मोबाइल, लॅपटॉप, टॅब आणि इंटरनेटसाठी तत्सम सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक ठरत आहे. त्यामुळे यंदाही अनेक पालकांचा आपल्या पाल्यांच्या शिक्षणावर होणारा खर्चाचा बोजा वाढलेला आहे. प्रत्यक्ष शाळा नसल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा ताण जरी थोडा कमी झालेला असला तरी पालकांवरील खर्चाचा ताण मात्र अधिकच वाढत आहे. ट्यूशन फीबरोबरच शाळा इतरही विविध प्रकारचे शुल्क फीमधून वसूल करताहेत, तर पाल्याच्या ऑनलाइन शिक्षणात अडथळा येऊ नये यासाठी पालकही कोणतीही कमी ठेवत नसून दुसरीकडे एकाच घरात एकापेक्षा जास्त मुले असल्यास अनेकदा त्यांच्या ऑनलाइन शाळेच्या वेळा एकच असतात. घरात एकच मोबाइल असला की, मग एखाद्या मुलाला ऑनलाइन क्लास अटेंड करता येत नाही किंवा अर्ध्यातच सोडावा लागतो. परिणामी त्यांचे शैक्षणिक नुकसान होते हे लक्षात घेता काही पालकांनी घरात मुलांच्या आवश्यकतेनुसार मोबाइल किंवा लॅपटॉप घेऊन देत त्यांच्या शिक्षणाची सोय करून दिलेली दिसत आहे. सोबत नवीन इंटरनेट कनेक्शन किंवा वायफायची सोयही पालकांनी प्राधान्याने केलेली आहे. त्यामुळे अनेक पालकांचा पाल्यासाठीचा शैक्षणिक खर्च किमान ३० ते ४० हजारांनी वाढला आहे.
------------
आधी घरात आम्हा दोघांकडे फोन होते. मी ऑफिसला गेल्यावर दोन मुलांच्या ऑनलाइन शाळा एकाच मोबाइलवर होत असे. मात्र, कधी वेळा सारख्या असल्या तर मग एकाला क्लास जॉइन करता येत नव्हता. यंदा तर दोघांची एकच वेळ असल्याने गोंधळ होता. शेवटी अभ्यास महत्त्वाचा असल्याने एकासाठी अजून एक मोबाइल घ्यावा लागला. दोन्ही मोबाइलवर रिचार्ज करण्यापेक्षा वायफाय सुविधाही घेतली; पण सगळे खूप खर्चिक आहे.
दीपांकर रावते, पालक
-----------------
मला तीन मुले आहेत. आम्हा पती-पत्नीकडे ॲड्रॉइड फोन होता; पण नवऱ्याला ऑफिसला जाताना फोन न्यावा लागतो. गेल्या वर्षी मुलांच्या शाळा एकाच फोनवर कशातरी ॲडजस्ट केल्या; पण यंदा एकाचे दहावीचे वर्ष आहे. त्याचे दिवसभर क्लास असतात. ते बुडवून चालणार नाही. त्यामुळे त्याच्यासाठी लॅपटॉप घेतला आणि दोन मुलींच्याही शाळेच्या वेळा वेगळ्या आहेत. माझा फोन असतो; पण अजून एक नवीन मोबाइलही घेतला. त्याच्यासाठी इंटरनेट कनेक्शन जोडून घेतले. हा खर्च ४० हजारांहून जास्त झाला आहे.
संस्कृती दबडकर, पालक
----------
चौकट
नवीन, चांगला फोन घ्यायचा म्हटला तर कमीत कमी दहा ते बारा हजार रुपये खर्च आहे आणि लॅपटॉप घ्यायचा म्हटला तरी पंधरा ते पंचवीस हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. ऑनलाइन क्लाससाठी केवळ मोबाइल असून चालत नाही, त्यासाठी इंटरनेटची सुविधा आवश्यक आहे. प्रत्येक मोबाइलवर वेगळे रिचार्ज करण्यापेक्षा अनेक पालकांनी घरात वायफायची सुविधा नव्याने घेतली आहे. ते नवीन कनेक्शन आणि त्याचे महिन्याचे स्पीडनुसार रिचार्ज याचा खर्चही साधारण हजार रुपये आहे.