ठाणे - रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ)च्या भरतीसाठी सेंट्रल रूटमेंट कमिटी (सीआरसी) च्या वतीने बुधवार, 19 डिसेंबर 2018 रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. संपूर्ण देशात होणाऱया या परीक्षेसाठी ठाणे जिह्यात यासाठी दोन केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. देशभरातून जवळपास 73 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतील अशी अपेक्षा आहे.
ही परीक्षा ठाणे शहरात एमबीसी पार्क, हायपर सिटी जवळ, कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे आणि नवी मुंबईत 504, पाचवा मजला, गौरी कॉम्पलेक्स, सेक्टर-11, सीबीडी-बेलापूर, बँक ऑफ इंडिया मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऍण्ड झोनल ऑफिसच्या समोर येथे होणार आहे.
उमेदवारांना प्रवेश पत्र देण्यात आलेली असून ज्या उमेदवारांना मिळाले नसेल त्यांनी www.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईटवरून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल. याच वेबसाईटवर उमेदवारांना प्रवेश पत्रासोबतच, सराव परीक्षा `प्रॅक्टिस टेस्ट'ची लिंकही उपलब्ध आहे.
प्रवेश पत्रामध्ये नमूद केलेल्या संबंधित बॅचनुसार, उमेदवाराने पोहोचण्याची वेळ (रिपोर्टिंग टाइम), प्रवेश द्वार बंद केले जाण्याची वेळ आणि परीक्षा प्रारंभ वेळ काळजीपूर्वक लक्षात घेऊन त्या वेळांचे कसोशीने पालन करावयाचे आहे.
प्रवेशपत्रात सूचित केल्याप्रमाणे, सरकारद्वारे मान्यताप्राप्त असलेल्या छायाचित्र असलेला ओळखीच्या पुराव्याची (Original Government Approved Photo ID Cards) अस्सल प्रत उमेदवारांनी सोबत आणली पाहिजे. ओळख पुराव्याची झेरॉक्स/ छायांकित प्रत स्वीकारली जाणार नाही. उमेदवारांकडे जर छायाचित्र असलेल्या ओळख पुराव्याची सत्यप्रत नसल्यास, जरी त्यांच्या अधिकृत प्रवेशपत्र असले तरी त्यांना परीक्षा स्थळी प्रवेश दिला जाणार नाही.
मोबाईल फोन, पेजर, घड्याळ, ब्ल्यूटूथ सक्षम डिव्हाइसेस, कॅल्क्युलेटर, धातूची परिधान सामग्री, बांगड्या, बेल्ट, ब्रेसलेट किंवा आरएफ उपकरणे वगैरे परीक्षा केंद्राच्या आत घेऊन जाण्यास उमेदवारांना परवानगी नाही. परीक्षा केंद्रामध्ये वरीलपैकी कोणतीही वस्तू उमेदवारांसह आढळल्यास असे उमेदवार अपात्र ठरतील आणि त्यांना परीक्षेस प्रवेश नाकारला जाईल.
उमेदवाराच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर मेंदी / हिना लावलेली नसेल, कारण नोंदणी प्रािढयेदरम्यान बायोमेट्रिक डेटा मिळविण्यात त्यामुळे अडचण येऊ शकते.
परीक्षा सुरू होण्यापूर्वी संगणकाच्या पडद्यावर एक स्व-घोषणापत्र परिच्छेद प्रदर्शित केला जाईल. परीक्षेला बसलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांच्या प्रवेशपत्रावर दिलेल्या जागेत परीक्षा स्थळीच तो उतारा लिहून काढावा लागेल.
प्रश्नाचे उत्तर देण्याची योग्य तो पर्याय निवडल्यानंतर उमेदवारांनी सेव्ह अँड नेक्स्ट (SAVE & NEXT) वर क्लिक करणे आवश्यक आहे. जर उमेदवार थेट दुसऱया प्रश्नावर गेला तर त्याचे उत्तर जतन केले जाणार आणि त्याचे गुणासाठी मूल्यांकनही होणार नाही. सर्व उमेदवारांना आरपीएफ वेबसाइटवर उपलब्ध सराव परीक्षेतून जाण्याचा सल्ला दिला जात आहे.
परीक्षा केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारचा दुराचार / गैरवर्तन / बेशिस्त / तोतयागिरी तसेच अयोग्य साहित्यासह उमेदवार आढळून आल्यास, भविष्यातील आरपीएफ परीक्षा आणि रेल्वेच्या नियुक्तीमधून त्या उमेदवाराला कायमचा अपात्र घोषित केले जाईल.