ठाणे : सिमकार्डवर जिओ कंपनीचा ११ रुपयांचा रिचार्ज केला नाही, तर तुमचे सिमकार्ड बंद पडेल, अशी भीती दाखवित कळवा येथील रामचेट सिंग (५८, रा. पारसिकनगर) यांची तब्बल सव्वासहा लाखांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना नुकतीच घडली आहे. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात अनोळखी ठकसेनाविरुद्ध शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
कळवा, पारसिकनगर येथील रहिवासी रामचेट हे २६ जुलै रोजी दुपारी ३.३० ते ४.३० वाजण्याच्या सुमारास घरी असताना एका भामट्याने त्यांच्या मोबाइलवर फोन केला. तुमच्या जिओ कंपनीच्या सिमकार्डवर ११ रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. तो केला नाही तर तुमचे सिमकार्ड बंद पडेल. जर तुम्हाला ही सेवा चालू ठेवायची असेल तर रिचार्जक्यूब या लिंकवर ११ रुपयांचा रिचार्ज करा, असा त्याने हिंदीतून मेसेज केला; परंतु रिचार्ज पूर्ण होत नसल्यामुळे सिंग यांनी घाबरुन या अनोळखी व्यक्तीला फोन केला. हीच संधी साधत या भामट्याने टीम व्ह्यूवर हा ॲप डाउनलोड करण्यास त्यांना सांगितले. त्यानंतर पेटीएमद्वारे त्यांचे बँकेतील पैसे वळते करून घेऊन त्यांची सहा लाख २५ हजारांची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सिंग यांनी याप्रकरणी ११ सप्टेंबर रोजी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.