-कुमार बडदेमुंब्रा : फक्त शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यापुरती मर्यादित असलेली ज्ञानार्जनाची पद्धत आॅनलाइन शिक्षणपद्धतीमुळे बदलली आहे. यामुळे शिक्षकांची जबाबदारी कैकपटीने वाढली असल्याची माहिती काही शिक्षकांनी शिक्षक दिनाच्या दिवशी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशातील बहुतांश शाळांनी विद्यार्थ्यांना आॅनलाइन पद्धतीने धडे देण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वीच्या शिक्षणपद्धतीमध्ये वर्गामध्ये फक्त विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्येच अध्ययनाबाबत देवाणघेवाण होत होती.परंतु, सध्या सुरू असलेल्या आॅनलाइन शिक्षणपद्धतीमध्ये शिक्षक शिकवत असलेल्या शिकवण्याकडे बहुतांश पालकही आवर्जून लक्ष देत आहेत.
जर एखादा पालक शिक्षक शिकवत असलेल्या विषयाबाबत समाधानी झाला नाही, तर तो संबंधित शिक्षकाशी संपर्क साधून त्यांची शंका विचारत आहे. ते विचारत असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी तसेच शिकवत असलेल्या विषयाचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनाही व्यवस्थित आकलन होईल, अशा पद्धतीने शिकविण्यासाठी शिक्षकांना प्रथम स्वत:ला त्याचे सर्व बाजूने आकलन करून घ्यावे लागते.त्यानंतर ते शिकवावे लागत आहे. याकडे शाळा संचालकही जातीने लक्ष देत असून शिक्षक अद्ययावत राहावेत, यासाठी ते वेळोवेळी शिक्षकांच्या बैठका घेत असल्याची माहिती मुंब्य्रातील ज्ञानदीप विद्यामंदिर या शाळेतील शिक्षक हेमंत नेहते यांनी ‘लोकमत’ला दिली.
मोबाइलचे तांत्रिक फायदेही समजले
आॅनलाइन शिक्षणपद्धतीमुळे मोबाइल हा फक्त खेळण्यासाठी किंवा संभाषणासाठी नसून तांत्रिकदृष्ट्या त्याचे इतरही अनेक फायदे असल्याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली. याचा फायदा त्यांना त्यांच्या भावी आयुष्यात निश्चितपणे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.