कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील दोघांना आॅनलाइनद्वारे सुमारे पावणेदहा लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.पहिल्या घटनेत अशोक नागनगौडन (रा. साईप्रस्थ, वसंत व्हॅली, कल्याण) यांना भूषण राय याने १२ हजारांचा गंडा घातला. रायने अशोक यांना शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता दूरध्वनीद्वारे डेबिट कार्डची माहिती विचारली. त्यावर, त्यांनी विश्वास ठेवून ती माहिती दिल्यानंतर काही क्षणातच अशोक यांना बँक खात्यातून १२ हजार रु पये काढून घेतल्याचा मॅसेज आला. याप्रकरणी अशोक यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.दुसऱ्या घटनेत अनिवासी भारतीयाला गंडा घालण्यात आला. कृष्णकांत कुन्नथ (रा. मानपाडा रोड, डोंबिवली) नोकरीनिमित्त इराण येथे स्थायिक झाले आहेत. चर्चगेट येथील एका बँकेत त्यांचे एनआरआय सेव्हिंग खाते आहे. जुलै २०१६ ते जानेवारी २०१७ दरम्यान अनोळखी व्यक्ती त्यांच्या खात्यातून वेळोवेळी रक्कम काढत होता. कृष्णकांत यांनी या बँकेतून डेबिटकार्ड, इंटरनेट बँकिंग अशी कोणतीही सुविधा घेतलेली नाही. मात्र, चोरट्याने त्यांच्या खात्यातून एटीएमकार्ड तसेच आॅनलाइन खरेदीद्वारे ९ लाख ५४ हजार ३५४ रु पये लुबाडले आहेत. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (प्र्रतिनिधी)
आॅनलाइनद्वारे पावणेदहा लाख लंपास
By admin | Published: January 23, 2017 5:22 AM