पंकज रोडेकरठाणे : ठाणे प्रादेशिक परिवहन विभागातील पारदर्शक कारभार चालण्यासाठी परिवहन प्रशासनाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. शिकाऊ परवाना प्रणालीपाठोपाठ आता परवान्यांसंबंधित पैसेही भरण्यासाठी सारथी प्रणाली ठाण्यात सोमवारी कार्यान्वित केली आहे. यामुळे तासन्तास रांगेत उभे राहावे लागणा-यांना आता घरबसल्या 24 तासांत कधीही पैसे भरता येणार आहेत. या प्रणालीमुळे भ्रष्टाचाराला चाप बसणार आहे. त्याचबरोबर या संबंधित कामासाठी दिवसा जमा होणा-या रकमेपेक्षा आता दुपटीने रक्कम जमा होऊ लागल्याची माहिती आरटीओ सूत्रांनी दिली.ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या मर्फी कार्यालयात नोव्हेंबर 2016 मध्ये शिकाऊ परवाना प्रणालीला सुरुवात झाली. त्याच धर्तीवर सारथी ही नवीन प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीनुसार, नवीन परवाना असो वा बनावट परवाना किंवा त्याचे नूतनीकरण असो. तसेच इतर परवान्यांसंबंधित कामांचे पैसे आता ऑनलाइन भरावे लागणार आहे. यामुळे पूर्वीप्रमाणे ठाणे आरटीओच्या मर्फी कार्यालयात जाऊन पैसे भरण्यासाठी जरी चार खिडक्या सुरू असल्या तरी, पैसे भरण्यासाठी त्यावर नेहमीच गर्दी पाहण्यास मिळत होती. यामुळे रांगेत तासन्तास उभे राहण्याशिवाय पर्याय नव्हता. अथवा, दलालांना पैसे देऊन ही कामे क रून घ्यावी लागत होती. त्याचबरोबर त्या चार खिडक्यांवर दिवसाला सुमारे दीड लाख रुपये जमा होत होती.परंतु ऑनलाइन प्रणाली सुरू झाल्याने पहिल्याच दिवशी सुमारे तीन ते साडेतीन लाख, तर दुस:या दिवशी साधारणत: चार लाख रुपये जमा झाल्याची माहिती आरटीओ सूत्रंनी दिली. या प्रणालीमुळे पैसे भरण्यासाठी खर्च होणारा वेळ आणि होणारे हेलपाटेही कमी होणार आहे. मात्र, हे सव्र्हर धीम्या गतीने सुरू असल्याने नागरिकांसाठी ते त्रासदायक ठरण्याची भीतीही वर्तवली जात आहे. ते जलद चालू राहण्यासाठी प्रशासनाने सुरुवातीपासून योग्य ती पावले उचलावी, अशी मागणीही पुढे येऊ लागली आहे. यासंदर्भात दुजोरा देऊन परवान्यांसंबंधित पैसे भरण्यासाठी नागरिकांनी संकेतस्थळावर जाऊन पैसे भरायचे आहे. तसेच ती पावती डाउनलोड करून अर्जाला जोडायची. या प्रणालीमुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल, त्याचबरोबर दलालांनाही 100 टक्के चाप बसेल. - नंदकिशोर नाईक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे
वाहन परवान्यांचे पैसेही भरा आता ऑनलाइन, ठाणे आरटीओचा अभिनव उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2017 10:24 PM