- सुरेश लोखंडे ठाणे : जिल्हा परिषदेच्या नियंत्रणातील सुमारे दोन हजार पेक्षा अधिक प्राथमिक शिक्षकांच्या मंगळवारी सायंकाळी ऑनलाइन बदल्या झाल्या. बदली झालेल्या शाळांची नावेही त्यांना आॅनलाईन कळविण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी शिक्षकांमध्ये एकच खडबळ उडाली आहे.कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक आणि ठाणे व पालघर जिल्ह्यातील शिक्षक समायोजनाच्या समस्येस अनुसरून प्राथमिक शिक्षकांच्या या आॅनलाइन बदल्या रखडल्या होत्या. राज्यातील अन्य जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्या या आधीच झाल्या आहेत. कोकण विभागातील ठाणे, पालघर,रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या पाच जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या या आॅनलाइन बदल्या मंगळवारी झाल्या. त्यात ठाणे जिल्ह्यातील दोन हजार पेक्षा अधिक प्राथमिक शिक्षकांचा समावेश आहे.जिल्हातंर्गत बदल्यांसाठी आॅनलाइन पद्धतीने शिक्षकांकडून वेळोवेळी अर्ज भरून घेण्यात आले. मात्र, त्यानुसार अजूनही बदल्या केल्या नव्हत्या. नोव्हेंबरअखेर ग्रामविकास विभागाचे अवर सचिव प्रि. श. कांबळे यांनी कोकण विभागातील या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी आदेश जारी करून ५ डिसेंबरपासून आॅनलाइन अर्ज भरून घेतले. त्यानंतर मंगळवारी या आॅनलाइन बदल्या केल्या. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील दोन हजार शिक्षक त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार या बदल्यास पात्र ठरले आहेत. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे यांना विचारणा केली असता अद्याप सविस्तर असे काही कळाले नसल्याचे लोकमतला सांगितले.वर्षानुवर्ष ग्रामीण व दुर्गम भागात कार्यरत असलेल्या शिक्षकांसह दिव्यांग, घटस्फोटीत, परितक्त्या शिक्षिकांसह अवघड क्षेत्रात म्हणजे मुख्य शहरापासून दुर्गम, डोंगराळ भागातील म्हणजे अवघड क्षेत्राच्या शाळेतील शिक्षकांना आॅनलाइन बदल्यामुळे शहरातील व शहराजवळील म्हणजे सोप्या क्षेत्रात शाळेत बदली झाली आहे. तर काही शहराजवळील शिक्षकांच्या बदल्या आहेत.या बदल्या रद्द करण्यासाठी मात्र कोणाच्या शिफारशींचा विचार केलेला नाही. पात्र शिक्षकांनी आॅनलाइन अर्ज भरून त्यात दिलेल्या सुमारे २० शाळांमधील शाळांवर या शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. शहराजवळील शिक्षक अवघड क्षेत्रातील शाळेत तर तेथील शिक्षकांची सोपे म्हणजे शहराजवळील शाळेत बदली झाली आहे.>जिल्ह्यातील ३६६शिक्षक राहिले गाफील !बदल्यासाठी पात्र असूनही सुमारे ३६६ शिक्षकांना आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी २० शाळांचा विकल्प देता आला नाही. यामुळे त्यांना अर्ज भरता आला नाही. मात्र, या शिक्षकांना आॅनलाइन बदल्यांच्या प्रक्रियेच्या रॅडम राउंडला शाळा देऊन बदली करता येणार असल्याची शिक्षकांमध्ये चर्चा आहे.वेळोवेळी आॅनलाइन अर्ज दाखल केलेल्या शिक्षकांना या वेळी अर्जात दुरुस्ती किंवा अर्ज रद्द करून नवीन अर्ज भरण्याची संधी दिली होती. यात नव्याने पात्र ठरणाऱ्या शिक्षकांनादेखील आॅनलाइन अर्ज दाखल करावे लागले आहेत.प्राप्त होणाऱ्या माहितीपत्रकात ठिकठिकाणच्या रिक्त जागांची माहिती शिक्षकांना त्त्वरीत देण्यात आली होती तरीदेखील काही शिक्षक गाफिल राहिल्यामुळे त्यांना अर्ज भरता आला नाही. शिक्षकांच्या आॅनलाइन पद्धतीने बदल्या करण्याचे धोरण राज्य शासनाने निश्चित केल्यामुळे राजकीय शिफारशींना त्यात वाव मिळालेला नाही.
दोन हजार शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 12:38 AM