अजित मांडके ठाणे : अगदी काही दिवसांवर आलेल्या गणोशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आजही शहरातील सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी मिळाली नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यानुसार १९२ पैकी अवघ्या १९ मंडळांनाच मंडप उभारणीची परवानगी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. परंतु केवळ स्थानिक पोलीस ठाणे आणि वाहतुक पोलीस, अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला न दिल्यानेच मंडप परवानगी रखडल्याचा दावा महापालिकेने केला आहे. त्यातही गणोशोत्सव मंडळांनी ऑनलाइन पेक्षा ऑफलाइन प्रक्रियेला पंसती दिल्यानेही या प्रक्रियेला उशीर झाल्याची माहिती पुढे आली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या माध्यमातून मंडळांना मंडप परवानगी तत्काळ मिळावी यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज स्विकृती प्रक्रिया सुरु केली होती. त्यानुसार प्रभाग समितीनिहाय एक खिडकी योजना सुरु करण्यात आली. त्यानुसार मागील काही दिवसात महापालिकेकडे दोन्ही पद्धतीने १९२ अर्ज प्राप्त झाले आहेत. मंडपासाठी अर्ज केल्यानंतर प्रभाग समितीमधील बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यांच्या माध्यमातून स्थळ ठिकाणी जाऊन मंडपाच्या आकाराची पाहणी केली जाते, त्यानंतर अर्ज पुढील प्रक्रि येसाठी पाठिवला जातो. स्थानिक पोलीस प्रशासन, वाहतूक शाखा आणि अग्निशमन या विभागांचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागत आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अर्ज अंतिम निकाली काढला जात आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेकडे आतापर्यंत ऑनलाइन पद्धतीने ८२ अर्ज प्राप्त झाले आहेत. तर प्रभाग स्तरावर ५६ अर्ज प्राप्त झाले आहेत. तर, उर्वरीत अर्ज महापलिकेच्या मुख्यालयाकडे प्राप्त झाले आहेत.
११० अर्ज ऑफलाईन पद्धतीने प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १०८ अर्जांवरील प्रक्रिया पूर्ण करून स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस आणि अग्शिनमन विभाग या विभागांकडे ना हरकत दाखल्यासाठी पुढे पाठविण्यात आले आहेत. त्यापैकीही केवळ १० मंडळानी या तिन्ही विभागाचे ना हरकत प्रमाणपत्न जमा केल्याने केवळ त्यांनाच परवानग्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंडळांनी या तीनही विभागांचे प्रमाणपत्र सादर करावे असे आवाहन पालिकेने केले आहे. एकूणच महापालिकेने आता मंडप परवानगीला होत असलेल्या दिरंगाई बाबत पोलीस, वाहतूक पोलीस आणि अग्निशमन विभागाकडे बोट दाखविले आहे.
मंडप परवानगी मिळावी यासाठी आमच्या स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. मात्र मंडळांनी ऑफलाइन प्रक्रियेला अधिक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता अशा मंडळांकडून अद्यापही वाहतूक, स्थानिक पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून परवानग्या न आणल्याने परवानगी देणे शिल्लक राहिले आहे. परंतु त्यांनी हा दाखला जमा केल्यास विना विलंब त्यांना पालिका प्रशासनाकडून परवानगी देण्यात येईल.गजानन गोदापुरे, उपायुक्त, ठाणे महापालिका