उल्हासनगर : कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणीचे काम तहसीलदार कार्यलयाकडून होत आहे. गेल्या २० दिवसात फक्त २४ मतदार नोंदणीसाठी अर्ज आल्याची माहिती नायब तहसीलदार गणपत शिंगाडे यांनी दिली. राजकीय नेते व राजकीय पक्षाकडून भरून आलेल्या अर्जाची गठ्ठे एकत्रीपणे स्वीकारण्यात येणार नसल्याचा पवित्रा शिंगाडे यांनी घेतला आहे.
कोकण पदवीधर संघासाठी ३० सप्टेंबर ते ६ नोव्हेंबर दरम्यान मतदार नोंदणी कार्यक्रम प्रत्येक तहसीलदार कार्यालया मार्फत सुरू आहे. उल्हासनगर तहसील कार्यालयात गेल्या २० दिवसात फक्त २४ अर्ज मतदार नोंदणीसाठी आल्याने, मतदारांनी मतदार नोंदणीकडे पाठ फिरविल्याचे चित्र शहरात आहे.
जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी होण्यासाठी तहसील कार्यालयाने बुधवारी महापालिकेत मतदार नोंदणीच्या शिबिराचे आयोजन करून मतदार नोंदणी अर्जाचे वाटप केले. तसेच शहरातील शाळा व महाविद्यालयात मतदार नोंदणी अर्ज दिली आहे. मात्र गेल्या २० दिवसात २४ अर्ज मतदार नोंदणीसाठी आल्याने, तहसील कार्यालयातील निवडणूक विभाग व नायब तहसीलदार गणपत शिंगाडे यांच्या कार्यपद्धतीवर शहरातून टीका होत आहे.
आमदार कुमार आयलानी यांच्या आमदार कार्यालयाच्या वतीने पदवीधर मतदारसंघासाठी १२०० मतदार नोंदणी अर्ज भरून घेतल्याची माहिती स्वतः आमदार आयलानी यांनी पत्रकारांना दिली. पदवीधर मतदारसंघासाठी भरलेले मतदार नोंदणी अर्ज उल्हासनगर तहसील कार्यालयात जमा करण्या ऐवजी आमदार निरंजन डावखरे यांच्या कार्यालयात जमा केली. अर्जाला जोडलेल्या पदवी प्रमाणपत्रावर गॅजेटेंट अधिकाऱ्यांची सही व शिक्का घेतल्यानंतर, जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज जमा करण्यात येणार असल्याचे आमदार म्हणाले. तर नायब तहसीलदार गणपत शिंगाडे यांनी मतदारांनी स्वतः तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात येऊन मतदार नोंदणीसाठी अर्ज करायचा आहे. तसेच पदवीच्या प्रमाणपत्रावर गॅजेटेट अधिकाऱ्यांची सही शिक्का असेलतरच अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती शिंगाडे यांनी दिली. स्थानिक नेते व विविध पक्षाकडून आलेले अर्जाचे गठ्ठे स्वीकारण्यात येणार नसल्याचे शिंगाडे म्हणाले.