लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राज्यात डेल्टा प्लसने चिंता वाढविली आहे. तशीच चिंता ठाणे जिल्ह्यातही वाढली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटत असली तरी आता लसीकरणदेखील थांबले आहे. त्यातच आता डेल्टा प्लसची भर पडल्याने कोरोनाला रोखायचे कसे, असा पेच निर्माण होणार आहे. डेल्टा प्लसला रोखायचे असेल तर त्यासाठी लसीकरण होणे गरेजेचे आहे. परंतु, जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या अवघे २७ टक्केच लसीकरण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यातही पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण हे २१ टक्के तर दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण अवघे सहा टक्के आहे.
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यात आता डेल्टा प्लसनेदेखील जिल्ह्यात चिंता वाढवली आहे. जिल्ह्यात अद्यापही डेल्टाचा रुग्ण आढळला नसला तरी त्याचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. या व्हेरिएन्टला रोखायचे असेल तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचे लसीकरण होणे गरजेचे आहे. जानेवारीपासून आतापर्यंत ९९ लाख ४२ हजार ४०७ लोकसंख्येच्या ठाणे जिल्ह्यात केवळ १९ लाख ८६ हजार ३०४ नागरिकांचे म्हणजेच २७ टक्केच लसीकरण झाले आहे. त्यातही पहिला डोस घेतलेल्यांचे प्रमाण यात २१ टक्के असून दुसरा डोस घेतलेल्यांचे प्रमाण अवघे सहा टक्केच असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली. तालक्यानिहाय विचार केल्यास ठाण्यात २२ लाख लोकसंख्येपैकी २८ टक्के म्हणजेच इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिकचे लसीकरण झाले आहे. त्यातही पहिला डोस २१ टक्के नागरिकांनी घेतला आहे. तर दुसरा डोस सात टक्के नागरिकांना दिला आहे. १० लाख ४ हजार ३४६ लोकसंख्येच्या मीरा-भाईंदर शहरात ३८ टक्के लसीकरण झाले आहे. यामध्ये पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण २८ आणि दुसरा डोस घेतलेल्यांचे प्रमाण १० टक्के एवढे आहे. नवी मुंबईतदेखील १५ लाख २ हजार २१० लोकसंख्येपैकी ३६ टक्के लसीकरण झाले असून यामध्ये पहिला डोस २७ टक्के आणि दुसरा डोस नऊ टक्के नागरिकांनी घेतला आहे. कल्याण-डोंबिवलीत १९ लाख १६ हजार ८६३ लोकसंख्येपैकी २३ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये पहिला डोस १९ टक्के आणि चार टक्के नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. भिवंडीमध्ये ७ लाख ११ हजार ३२३ लोकसंख्येपैकी १३ टक्के लोकसंख्येचे पहिला आणि दुसरा डोस झाला आहे. यामध्ये ११ टक्के पहिला डोस आणि २ टक्के नागरिकांचा दुसरा डोस झाला आहे. उल्हासनगरमध्ये ५ लाख ६ हजार लोकसंख्येपैकी २० टक्के नागरिकांचा पहिला आणि दुसरा डोस झाला आहे. यामध्ये १७ टक्के नागरिकांचा पहिला आणि तीन टक्के नागरिकांचा दुसरा डोस झाला आहे. तर ठाणे ग्रामीणमधील २० लाख ५८ हजार ७५५ लोकसंख्येपैकी २३ टक्के नागरिकांचे पहिला आणि दुसरा डोस पूर्ण झाला आहे. यामध्ये १९ टक्के नागरिकांचा पहिला आणि तीन टक्के नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे.
जिल्ह्यातील लसीकरण
एकूण लसीकरण - १९,८६,३०४
पहिला डोस - १५,४७,३५१
दुसरा डोस - ४,३८,९५३
कोणत्या तालुक्यात किती? (ग्राफ)
पहिला डोस - दुसरा डोस
ठाणे ग्रामीण - २,९०,१५५ - ६३,०५८
कल्याण-डोंबिवली - २,६०,६०३ - ६२,२५३
उल्हासनगर - ६५,१६२ - १२,८२९
भिवंडी - ५७,४७१ - ११,८०९
ठाणे - ३,५१,९९० - १,११,१२५
मीराभाईंदर - २,१९,५४३ - ७५,५४२
नवी मुंबई - ३,०२,४२७ - १,०२,३३७
१८ ते ४४ वयोगटात केवळ ५.७ टक्के लसीकरण
१८ ते ४४ हा वयोगट सर्वात महत्त्वाचा वयोगट मानला जात आहे. कामाच्या निमित्ताने याच वयोगटातील नागरिक सर्वाधिक प्रमाणात बाहेर असतो. त्यामुळे डेल्टा प्लसला रोखायचे असल्यास या वयोगटाचे लसीकरण होणे महत्त्वाचे आहे. परंतु, मध्यंतरी सुरू केलेल्या या वयोगटातील लसीकरणाला लस उपलब्ध नसल्याने ब्रेक लागला होता. आता पुन्हा ते सुरू झाले आहे. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत या वयोगटातील २ लाख ५६ हजार १२३ नागरिकांचे म्हणजेच अवघे ५.७ टक्केच लसीकरण झाल्याचे दिसून आले आहे.