स्नेहा पावसकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : दहावीचे मू्ल्यमापन प्रक्रियेत शाळांना गुणदान प्रक्रियेसाठी काही कालावधी दिला होता. मात्र, ठाणे जिल्ह्यातील केवळ ४० टक्के शाळांनीच ही गुणदान प्रक्रिया पूर्ण केली असून, त्यामुळे आता निकालास उशीर झाला तर त्यास ठाण्यातील शाळासुद्धा जबाबदार राहणार आहेत.
कोरोनामुळे यंदा दहावी, बारावीच्याही परीक्षा झाल्या नाहीत. मात्र, विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करताना अंतर्गत मूल्यमापन करून गुणदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या गुणदानाचे काम करण्याची जबाबदारी राज्यभरातील शिक्षकांना दिली होती. शाळेत जाऊन त्यांना ते गुणदान प्रक्रिया करायची आहे. ३० जून त्यासाठीची अंतिम मुदत दिली होती. मात्र, ३० जूनपर्यंत ठाणे जिल्ह्यातील केवळ ४० टक्के शाळांनी ही गुणदानाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित ६० टक्के शाळांचे काम सुरूच असून, ते पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे. शिक्षकांना शाळेत पोहोचण्याबाबत वाहतूक साधनांच्या अडचणी असल्याने या प्रक्रियेसाठी विलंब होत असल्याचे काही शिक्षक सांगतात.
-------------
ठाणे जिल्ह्यातील ४० टक्के शाळांनी दहावीची गुणदान प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित ६० टक्के शाळांचे काम सुरू आहे. रेल्वे प्रवास शिक्षकांना करता येत नसल्याने शिक्षकांना शाळेत पोहोचणे कठीण होते आहे. त्या कामासाठी शासन अजून मुदतवाढ देईल, त्यात ते काम शाळांकडून पूर्ण केले जाईल.
शेषराव बडे, शिक्षणाधिकारी, (माध्य), ठाणे जिल्हा
------------
आम्हा शिक्षकांना सर्रासपणे ट्रेनने प्रवास करता येत नाही. त्यामुळे अनेकदा शाळेत वेळेवर पोहोचण्याची गैरसोय होते. परिणामी कामाला उशीर होतोय. तसेच काहीवेळा तांत्रिक अडचणींमुळे हे काम खोळंबते, अशी माहिती काही शिक्षतांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
----------
जिल्ह्यातील ४० टक्के शाळांनीच पूर्ण केली गुणदान प्रक्रिया