ठाणे : पावसाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या समस्येला तोंड देण्यासाठी महापालिकांना केंद्र व राज्य शासनाने पाणी राखून ठेवण्याचे सुचविले आहे. या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मे महिन्याच्या प्रारंभी धरणातील पाणीसाठ्याची चाचपणी केली असता मुंबई, ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात गेल्या वर्षाच्या तुलनेत अवघा ४२.७१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यात दररोज पाणी वापरासह सध्याच्या उन्हाने बाष्पीभवन होऊन या महिनाअखेर हा पाणीसाठा अत्यल्प राहणार असल्याची चिंता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. त्यात दक्षिण पॅसिफिक महासागरात ‘अल निनो’ हा समुद्र प्रवाह सक्रिय झाला आहे. त्यामुळे मान्सून पर्जन्यमानावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. जूननंतर पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होणार आहे. यंदा विलंबाने होणारा पाऊस ७० ते ८० टक्के पडेल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे दुष्काळीस्थितीदेखील उद्भवू शकते. त्यामुळे पाण्याच्या वापरात काटकसर कशी करायची? धरणांमध्ये सध्या पाणीसाठा किती? त्यातून बचतीचा मार्ग अवलंबून पाणीसाठा राखून ठेवण्यासाठी महापालिकांना नगरविकास विभागाने धारेवर धरले आहे. मुंबई, ठाणे या महानगरांना शहापूरजवळील भातसा या मोठ्या जलाशयातून पाणीपुरवठा होतो. त्यात फक्त ४२.७१ टक्के म्हणजे ४०२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या धरणात आजपर्यंत ४७.०२ टक्के पाणीसाठा होता.
या धरणांत आहे एवढा पाणीसाठा
भातसाप्रमाणेच पाणीपुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणात २४ दलघमी पाणीसाठा असून, तो अवघा १३.६६ टक्के आहे. अप्पर वैतरणात ४९.५७ टक्के पाणीसाठा असून, १६४.२४ दलघमी पाणी उपलब्ध आहे. तानसात ३७.९१ टक्के साठा म्हणजे ५४.९९ दलघमी पाणी आहे. तर मोडकसागरमध्ये ४२.७३ दलघमी म्हणजे ३३.१४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ठाण्याप्रमाणेच जिल्ह्यातील केडीएमसी, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भाईंदर आदी महानगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीच्या आंध्रा धरणात ४३.२८ टक्के म्हणजे १४६.७८ दलघमी पाणीसाठा आहे. या शहरांसह सर्व एमआयडीसीमधील उद्योगांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणातही अवघा ४१.८४ टक्के साठा शिल्लक आहे. सध्या १४१.७८ दलघमी पाणीसाठा असून, गेल्या वर्षी मेच्या प्रारंभी ४६ टक्के पाणीसाठा होता.