ठाणे : ठाण्यासह जिल्ह्यात लसीकरणाचा साठा पुन्हा एकदा अपुरा पडू लागला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी अनेक केंद्रे बंद होती. जिल्हा शासकीय रुग्णालयातदेखील लसीकरण मोहीम ठप्प होती. ठाण्यात ५६ पैकी केवळ ११ केंद्रांवरच लसीकरण सुरू होते. उर्वरित ४५ केंद्रे बंद होती. जिल्ह्याच्या ठिकाणी शुक्रवारी केवळ ५० हजार २६० लसींचा साठा शिल्लक होता. यामध्ये कोव्हिशिल्डचा अवघा ४१ हजार ८२०, तर कोव्हॅक्सिनचा ८ हजार ४४० लसी शिल्लक आहे. त्यामुळे १ मेपासून लसीकरण कसे करायचे, असा पेच निर्माण झाला आहे.
ठाण्यासह इतर महापालिकांनीदेखील लसींचा साठा मिळावा, यासाठी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. परंतु अद्यापही तो उपलब्ध होऊ शकलेला नाही. त्यामुळे आता ठाण्यासह या दोन जिल्ह्यातही लसींचा तुटवडा निर्माण झाला असून, अगदी कमी साठा शिल्लक राहिल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे. भिवंडीकडे कोव्हॅक्सिनचे ४५० तर कोव्हिशिल्डचे २३२० डोस, ठाणे महापालिका हद्दीत कोव्हॅक्सिनचे अवघे ९० आणि कोव्हिशिल्डचे ३ हजार ६५० डोस आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोव्हॅक्सिनचे ५०० डोस असून, कोव्हिशिल्डचे ६ हजार २८० डोस, मीरा-भाईंदरमध्ये कोव्हॅक्सिनचे २ हजार ७१०, कोव्हिशिल्डचे ९ हजार ४००, नवी मुंबईत कोव्हॅक्सिनचे १ हजार ८७० व कोव्हिशिल्डचे ५ हजार ३६० डोस शिल्लक आहेत. उल्हासनगरमध्ये कोव्हॅक्सिनचे ६४०, कोव्हिशिल्डचे ३ हजार ५९० डोस शिल्लक आहेत.
ग्रामीण भागात कोव्हॅक्सिनचे २ हजार १८० आणि कोव्हिशिल्डचे ११ हजार २२० डोस शिल्लक आहेत. याच शिल्लक डोसमधून शुक्रवारी लसीकरण करण्यात आले. त्यामुळे शनिवारी लसींचा साठा मिळाला नाही, तर अनेक ठिकाणची लसीकरण केंद्रे बंद करण्याची वेळ स्थानिक प्रशासनावर येण्याची शक्यता आहे.