उल्हासनगर : महापालिकेने पावसाळ्यापूर्वीचा रस्त्यातील खड्डे न भरल्याने, संततधार पावसाने रस्त्याची दुरावस्था झाली. रस्त्यातील खड्ड्यावर उतारा म्हणून दगड, मातीने खड्डे भरण्यात येत असून वाहनचालकांनी यावर नाराजी व्यक्त केली.
उल्हासनगर महापालिकेने रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी ५ कोटीच्या निधीची तरतूद केली. मात्र संततधार पावसामुळे खड्डे भरण्यास अडथळे येत असल्याने, खड्डे मोठे दगड, रेती व मातीने तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येत असल्याची माहिती शहर अभियंता संदीप जाधव यांनी दिली. पावसाने विश्रांती घेतल्यावर रस्ते दुरुस्तीला सुरवात करण्यात येणार असल्याचे जाधव म्हणाले. दुसरीकडे पावसाळ्यापूर्वी महापालिकेने रस्त्यातील खड्डे भरले असतेतर, रस्त्याची दुरावस्था झाली नसती. अशी संतप्त प्रतिक्रिया रिक्षा चालक व नागरिक देत आहेत. हिराघाट कडून महापालिकेकडे जाणाऱ्या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले असून मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रस्त्यातील खड्ड्यामुळे दुचाकी गाड्या पडून दररोज अपघात होत आहेत. तसेच वाहने नादुरुस्त होत असल्याची प्रतिक्रिया वाहनचालक देत आहेत.
दुरावस्था झालेले रस्ते शहरातील हिराघाट रस्ता, पवई चौक ते विठ्ठलवाडी रस्ता, सुभाष टेकडी परिसरातील रस्ते, नेताजी चौक ते कुर्ला कॅम्प रस्ता, व्हीनस चौक ते एसएसटी कॉलेज रस्ता, मोर्या नगरी रस्ता, खेमानी परिसरातील रस्ते, गायकवाड पाडा रस्ता, शांतीनगर ते डॉल्फिन क्लब रस्ता यांच्यासह सिमेंट काँक्रीट रस्त्यावरही खड्डे पडले आहेत. महापालिका रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्याची दुरावस्था झाली आहे. तसेच एमएमआरडीए कडून बांधण्यात येणाऱ्या रस्त्याची चौकशी झाल्यास, मोठा झोल बाहेर पडणार असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. महापालिका आयुक्त अजीज शेख, शहर अभियंता संदीप जाधव यांनी रस्त्यातील खड्ड्याची पाहणी गेल्या आठवड्यात करून, संततधार पावसाने दगड, मातीने रस्त्यातील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात भरण्याचे आदेश दिले आहे.