लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यानुसार मागील काही दिवसांत एकापाठोपाठ एक बैठका घेतल्या जात आहेत. त्यातही महापालिकेच्या माध्यमातून प्रभाग रचनेसाठी जी समिती नेमली आहे, तीच अयोग्य असल्याचा आरोप ठाणे शहर काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे.
एका पत्रकार परिषदेत मंगळवारी त्यांनी ही माहिती दिली. ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुका एकसदस्यीय पद्धतीने घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन झाले पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी केली. महापालिका निवडणूक पारदर्शी पद्धतीने होण्यासाठी निवडणूक आयोगाकडून काही मार्गदर्शक सूचना दिल्या गेल्या आहेत. महापालिका आयुक्तांनी प्रभाग रचनेसाठी जी समिती नेमली आहे, तीच अयोग्य असल्याचा आरोप त्यांनी केला.
२०१७ च्या निवडणुकीत स्थापन केलेल्या समितीत जिल्हाधिकारी व तत्सम अधिकारी याचा समावेश होता. या वेळी समितीत वादग्रस्त अधिकारी अशोक बुरपुल्ले यांचा समावेश केल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. स्वरूप कुलकर्णी यांचा समितीशी संबंधच कुठे येतो, असा सवालही त्यांनी केला. या मुद्द्यांवर पक्षाचे शिष्टमंडळ प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
------------------