भार्इंदर : मीरा-भार्इंदर शहरांत रस्तोरस्ती भिकारी भीक मागताना दिसत असतानाही सहा पोलीस ठाण्यातर्फे ‘मुंबई भिक्षा प्रतिबंध कायदा १९५९’ नुसार आजमितीस केवळ ८ भिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. कृष्णा गुप्ता या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने माहितीच्या अधिकारात ही माहिती उजेडात आणली आहे.शहरात भिकाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत असून त्यामध्ये तृतीयपंथींचाही समावेश वाढत आहे. रस्त्यावरील सिग्नलपासून ते मंदिरे, लोकल गाड्यांत भिकाऱ्यांचा उपद्रव वाढत आहे. मुलांचे अपहरण करून त्यांना भीक मागावयास लावणारी टोळी कार्यरत असल्याची चर्चा वरचेवर कानांवर येते. भिकारी शहरातील रस्ते व्यापतात. तेथेच घाण करतात. रेल्वेचे पूल त्यांनी व्यापल्याने लोकांना चालणे मुश्कील होते. मंदिरात गेलेल्या भाविकांच्या चपला भिकाऱ्यांनी चोरल्याचे प्रकार घडले असून मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे ते उघडकीस आले आहे. लोकल व लांबपल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांत भिकारी भीक मागतात. भिकाऱ्यांचा उपद्रव रोखण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने १९५९ मध्ये मुंबई भिक्षा प्रतिबंध कायदा अमलात आणला. परंतु, त्या कायद्यान्वये उपद्रवी भिकाऱ्यांवर कारवाई करणे पोलीस टाळतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर व एका आगीच्या घटनेत भिकाऱ्याकडील नोटांचे घबाड उघडकीस आले होते. भिकाऱ्यांमध्ये गर्दुल्ल्यांचे प्रमाण अधिक असते. त्यांचा मादक द्रव्य पोहोचवण्यापासून गावठी दारूचे फुगे वाहून नेण्यासाठी वापर केला जातो. सामान्य नागरिक भिकाऱ्यांकडे सहानुभूतीच्या नजरेने पाहून त्यांना भीक देतात. परंतु, काही भिकारी भीक मागण्याच्या नावाखाली तसेच चार पैसे मिळवण्यासाठी बेकायदेशीर व्यवसाय करीत असतात. सध्या यात तृतीयपंथीयांचा शिरकाव झाला असून प्रत्येक सिग्नलवर त्यांचा वाढता उपद्रव महिला व तरुणींना त्रासदायक ठरत आहे. भिकाऱ्यांचा उपद्रव असह्य झाल्याने भार्इंदर येथील कृष्णा गुप्ता या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने २६ जुलै २०१६ रोजी मीरा-भार्इंदर पोलीस विभागीय कार्यालयाकडे माहिती अधिकारांतर्गत भिकाऱ्यांवरील कारवाईची माहिती मागितली. कार्यालयाने २६ आॅगस्ट २०१६ रोजी दिलेल्या माहितीत विभागांतर्गत पोलीस ठाण्यांत शहरातील एकाही भिकाऱ्यावर मुंबई भिक्षा प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला नसल्याचे स्पष्ट केले. त्यावर कृष्णाने २५ सप्टेंबर २०१६ रोजी राज्य सरकारचे ‘आपले सरकार’ या पोर्टलवर तक्रार दाखल केली. तसेच २८ सप्टेंबर २०१६ रोजी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनाही पत्र पाठवून भिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. त्यावर कार्यवाही न झाल्याने कृष्णाने पत्राच्या आधारे पुन्हा माहिती मागवली. (प्रतिनिधी)
केवळ आठ भिकाऱ्यांवर झाले गुन्हे दाखल
By admin | Published: February 01, 2017 3:17 AM