लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांच्या एकत्र महापालिकेला आमदार किसन कथोरे यांनी पुन्हा विरोध केला आहे. ज्या प्रमाणे बदलापूरचा विकास झाला आहे, तसा अंबरनाथचा झालेला नसल्याचा टोला त्यांनी तेथील राजकारण्यांना लगावला आहे.अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपालिकांची एकत्रित महापालिका तयार करण्याचा प्रस्ताव आला होता. पण या दोन्ही शहराच्या विकासाचा वेग पाहिल्यावर दोन्ही पालिका स्वतंत्र पालिकाच राहणे योग्य आहे. आजही अंबरनाथ पालिका विकासाच्या प्रवाहात आलेली नाही, तर बदलापूरने विकासाचा उच्चांक गाठला आहे. अशा परिस्थितीत अंबरनाथची स्वतंत्र महापालिका झालेली बरी, असे त्यांचे मत आहे.अंबरनाथच्या रोटरी सभागृहात भारतीय जनता पार्टीच्या शिवाजीनगर आणि वडवली विभागातर्फे १०वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम झाला. त्यात ते बोलत होते. या वेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे, किसन तारमळे, पुर्णिमा कबरे,शहर उपाध्यक्ष दीपक कोतेकर आणि सचिव संतोष शिंदे उपस्थित होते. बदलापूर शहराने गेल्या काही वर्षात चांगली प्रगती केली. मात्र, अंबरनाथ मागे पडले. या दोन्ही शहरांचा विचार करता अंबरनाथची स्वतंत्र महापालिका योग्य ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. अंबरनाथमध्ये पाच वर्ष आमदार असताना मी केलेली कामे निर्णायक ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण त्यानंतर गेल्या आठ वर्षात एकही मोठा प्रकल्प येथे विकसित झाला नाही, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला. अंबरनाथ तालुक्यात शैक्षणिक सुविधा जास्त प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी मी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्याला शैक्षणिक हब करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
अंबरनाथ, बदलापूरची स्वतंत्र पालिकाच बरी
By admin | Published: June 27, 2017 3:08 AM