लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मुंब्रा शहरातील अनेक इमारतींना तिसऱ्या मजल्यांपर्यंतच मालमत्ता कर आकारणी हाेत असून उर्वरित कर आकारणीच करण्यात येत नसल्याची धक्कादायक बाब राष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांनी शुक्रवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उघडकीस आणली. याची गांभीर्याने दाखल घेऊन शहरातील अशा मालमत्तांचा शोध घेऊन त्यांना येत्या १५ दिवसांत करआकारणी करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी प्रशासनाला दिले. कोरोनाकाळात केलेल्या टाळेबंदीमुळे अनेक क्षेत्रांवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यात अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अशातच ठाणे महानगरपालिकेच्या उत्पन्नावरही परिणाम झाला तरी सदस्यांनी उत्पन्नवाढीबाबत सुचविलेल्या उपायांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नगरसेवकांनी या वेळी केला. शहरात वाहनतळाची व्यवस्था निर्माण होईपर्यंत रस्त्याच्या कडेला वाहने उभी करण्यास परवानगी देऊन त्यांच्याकडून शुल्कवसुलीसाठी पार्किंग धोरण तयार केले होते. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी होत नसल्याने लाखो रुपयांच्या महसुलाला मुकावे लागत आहे. त्यात ट्रक टर्मिनलची व्यवस्था करणे, मालमत्ता शोधून कर लावणे अशा पर्यायांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप शिवसेनेचे नगरसेवक राम रेपाळे यांनी केला. मुंब्य्रात अनेक इमारतींना मोफत पाणीपुरवठा केला जात आहे. त्याचबरोबर तीन मजल्यांपर्यंत मालमत्ता कर लावला जातो. तर वरच्या मजल्यांना तो लावला जात नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांनी केला. त्याचबरोबर विविध माध्यमांतून उत्पन्न मिळू शकते. याबाबत नगरसेवकांनी अनेक पर्यायही सुचविले आहेत. पण त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे कोरोनाकाळात उत्पन्न वसुलीवर परिणाम झाल्याचा दावा करणे योग्य नसून प्रशासनाने नगरसेवकांनी सुचविलेल्या पर्यायांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असे राष्ट्रवादीचे नगरसेवक हनमंत जगदाळे यांनी सांगितले.करआकारणी करून अहवाल द्या अखेर शहरातील मालमत्तांचा शोध घेऊन त्यांना येत्या १५ दिवसांत करआकारणी करून त्याचा अहवाल सादर करावा असे आदेश सभापती भोईर यांनी दिले.
तीन मजल्यांपर्यंतच इमारतींना मालमत्ता कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2021 1:06 AM