अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीसाठीच्या सर्व मतदार यादीतील बोगस नावे रद्द होत नाहीत आणि चतुःसीमेबाहेरील मतदारांची नावे मूळ यादीत समाविष्ट होत नाहीत तोपर्यंत प्रभागानुसार सुधारित मतदार यादी प्रसिद्ध करू नये अशी मागणी अंबरनाथ भाजप पश्चिम विभागाचे अध्यक्ष राजेश कौठाळे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीसाठी ५७ प्रभागांच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकरणी शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने हरकती नोंदवल्या आहेत. मात्र काही प्रकरणांमध्ये संबंधित अधिकारी मतदार यादी दुरुस्तीसाठी जाणीवपूर्वक नकार देत असल्याचा आरोप कौठाळे यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या निवेदनात केला आहे.
पुरवणी मतदार याद्यांतील मतदारांच्या संबंधित दस्तऐवजांची स्थळ आणि ओळख पडताळणी करण्यात यावी. पडताळणीमध्ये आढळून येणारी बोगस नावे मतदार यादीतून वगळून त्यांच्यावर नियमानुसार गुन्हा दाखल करावा. एका प्रभागातील नावे दुसऱ्या मतदार यादीमध्ये समाविष्ट करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यावर नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी आयोगाकडे केली आहे.