मीरा रोड : मीरा- भाईंदर महापालिकेकडे गुरुवारी रात्रीपर्यंत कोविशिल्डच्या केवळ तीन हजार ३४० इतक्याच लस शिल्लक असल्याने शुक्रवारी पालिकेने दुसरा डोस असणाऱ्या केवळ ५०० जणांनाच लस दिली. लस नसल्याने पालिकेने सहा लसीकरण केंद्र तात्पुरती बंद केली असून, केवळ पाच केंद्रच सुरू ठेवली आहेत. लस नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला तर काही ठिकाणी वादाचे प्रसंग घडले.
सरकारकडून मीरा- भाईंदर महापालिकेला एक लाख सहा हजार ६२० लसी देण्यात आल्या होत्या. लसीकरणासाठी पालिकेने स्वतःची ११ लसीकरण केंद्र सुरू केली होती तर खासगी नऊ लसीकरण केंद्र आहेत. पालिकेने जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनाची लस लवकर मिळावी म्हणून रोजच्या तीन ते साडेतीन हजार लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट असूनही रोज पाच हजार नागरिकांना लस दिली जात होती. गुरुवारी रात्रीपर्यंत महापालिकेकडे केवळ तीन हजार ३४० लसच शिल्लक राहिल्या. सरकारकडून लस येणे तूर्तास अवघड असल्याने पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह चर्चा करून शुक्रवारपासून मीरा रोड, विनायक नगर, मुर्धा, पेणकर पाडा, नवघर व उत्तन केंद्रातील लसीकरण तापुरते बंद केले.
शुक्रवारपासून भीमसेन जोशी रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय, मीनाताई ठाकरे सभागृह, बंदरवाडी आरोग्य केंद्र व काशीगाव आरोग्य केंद्र या पाच ठिकाणीच लसीकरण सुरू ठेवण्यात आले आहे. नव्याने लस देणे बंद केले असून, ज्यांनी पहिला डोस घेतला आहे अशांनाच दुसरा डोस दिला जात आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रावर फक्त १०० जणांनाच लस दिली जात आहे. म्हणजेच लसीचा साठा येत नाही तोपर्यंत रोज एकूण ५०० नागरिकांनाच लस दिली जाणार आहे. जेणेकरून आज लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना लसीकरण केंद्र बंद झाल्याचे तर ज्या पाच ठिकाणी केंद्र सुरू होते तेथे केवळ दुसऱ्या डोसची लस दिली जाणार असल्याचे समजल्यावर संताप व्यक्त होत होता. काही ठिकाणी हुज्जत घातली जात होती. लस नसल्याने अनेक नागरिक रिकाम्या हाताने परत गेले. केवळ १०० जणांनाच लस द्यायची असल्याने दुपारनंतर केंद्रावर शुकशुकाट होता.
--------------------------------
सरकारकडून लसचा पुरवठा सुरू होताच पुन्हा सर्व केंद्रांवर लसीकरण सुरू केले जाईल. सध्या पाच केंद्रात लसीकरण सुरू आहे. तेथे रोज दुसरा डोस बाकी असणाऱ्या प्रत्येकी १०० जणांना लस दिली जात आहे. नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये. ऑनलाइन नोंदणी करावी. केंद्रात सर्व सुविधा व आवश्यक कर्मचारी तैनात आहेत.
डॉ. अंजली पाटील, लसीकरण अधिकारी