लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शासनाकडून प्राप्त लसीनुसार सध्या जिल्ह्यात सर्व शहरांत कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. परंतु, सर्वच शहरांसह ग्रामीण भागात लसींचा प्रचंड तुटवडा असला तरी खासगी रुग्णालयात मात्र रोखीने लसीकरण सुसाट सुरू आहे. जिल्ह्यातील या लसीकरणाचा विचार करता २१ लाख २२ हजार १५४ जणांचे पहिला व दुस-या डोसचे लसीकरण झाले आहे. यात अवघे २२ टक्के नागरिक पहिल्या डोसचे व ७ टक्के नागरिकांनी दुसरा डोस रविवारपर्यंत घेतला आहे.
कोरोनाच्या दुस-या लाटेच्या पाठोपाठ तिसरी लाट येऊ घातली आहे. हा कहर वाढण्याआधी पहिला डोस तरी मिळावा म्हणून नागरिकांच्या केंद्रांबाहेर रांगा लागत आहेत. जिल्ह्यात कोविशिल्ड या लसीला प्राधान्य दिले जात आहे. या खालोखाल कोव्हॅक्सिन नागरिक घेत आहेत. पण, या दोन्ही लसी मिळून जिल्ह्यात अवघ्या १६ लाख २७ हजार ८५३ जणांना पहिला डोस मिळालेला आहे. यावरून या पहिल्या डोसचे २२ टक्के, तर दुसरा डोस सात टक्के अवघ्या चार लाख ९४ हजार ३०१ स्री-पुरुषांना मिळालेला आहे. जिल्ह्यातील या लसीकरणाची कूर्मगती अशीच राहिल्यास तिसऱ्या लाटेच्या कहराला तोंड द्यावे लागण्याची भीती व्यक्त हाेत आहे.
जिल्ह्यातील ठाणे ग्रामीणसह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, ठाणे मनपा, मीरा-भाईंदर, नवी मुंबई या शहरांमध्ये एकूण ९९ लाख ४२ हजार ४०७ लोकसंख्येपैकी ४५ वर्षांवरील २९ लाख ८२ हजार ७२३ नागरिकांना या लसीचा प्राधान्याने लाभ मिळणे अपेक्षित आहे. यामध्ये यापैकी पहिला डोस ११ लाख एक हजार ८०५ जणांना (३७ टक्के) मिळालेला आहे. दुसरा डोस १२ टक्के म्हणजे तीन लाख ६१ हजार २९४ जणांनी घेतला आहे. या ४५ वर्षांपुढील १४ लाख ६३ हजार ९९ जणांना आतापर्यंत पहिला व दुसरा डोस मिळालेला असल्याचे निदर्शनात आले आहे.
------------