कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिकेन घनकचरा व्यवस्थाप कर लागू करुन त्याची वसूली सुरु केल्याने भाजपने पालकमंत्र्यांना लक्ष्य करीत पोस्टरबाजी केली होती. त्यावर आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी पोस्टर कुणीही लावू द्यात. काम फक्त शिवसेना करते. केलेले काम छाती ठोकून सांगण्याची धमक ठेवते, असा टोला भाजपा आमदार रविंद्र चव्हाण यांना त्यांचा नामोल्लेख न करता लगावला आहे.
खासदार शिंदे यांनी सांगितले की, कोरोना काळात कल्याण डोंबिवली सह लोकसभा मतदार संघात कोविड जंबो रुग्णालये उभी करण्यात आली. टेस्टींग लॅब सुरु केली. कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी दिला आहे. तसेच पालकमंत्र्यांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महापालिकेस १७ कोटीचा निधी नगरविकासखात्याकडून प्राप्त झाला. लोकांचा जीव वाचविण्यासाठी हे सगळे केले आहे. त्याचबरोबर कल्याण पत्री पूल जानेवारी महिन्यात खुला केला. याशिवाय दुर्गाडी खाली पूलावरील दोन लेन नुकत्याच सुरु केलेल्या आहे. कल्याण दुर्गाडी ते टिटवाळा हा रिंग रोड प्रकल्पाचा टप्पा ७० टक्के पूर्ण झाला आहे.
तिसऱ्या टप्प्याच्या निविदेसाठी 80 टक्के भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकर तिसऱ्या टप्प्याची निविदाही काढली जाणार आहे. याशिवाय मोठा गाव ठाकूर्ली ते माणकोली पूलाचे काम पूर्ण केले जात आहे. त्याचबरोबर कल्याण शीळ रस्त्याचे सहा पदरी सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. कल्याण शीळ रस्त्यवरील पलावा पूलाचे काम मार्गी लागणार आाहे. या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न जवळपासन निकाली निघणार आहे.
डोंबिवली निवासी आणि औद्योगिक भागातील रस्त्यांकरीता ११० कोटीचा निधी आणि कल्याण डोंबिवलीकरीता १५ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. ही कामे कोणी केले हे लोकांना चांगले माहिती आहे. लोकांना कामे झाल्याशी मतलब आहे. शिवसेना हे केवळ आणि केवळ विकास कामे करते. कोणाच्याही टिकेला भिक घालत नाही. पोस्टरबाजी करणा:यांनी ती खुशाल करावी. आम्ही काम ३६५ दिवस काम करतो. ते काम आम्ही करत राहणार असा निर्धार खासदार शिंदे यांनी व्यक्त केला आहे.