मुरलीधर भवार कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांमध्ये परवानगी घेऊन केलेल्या अधिकृत बांधकामांचा आकडा अवघा ६२ असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाल्याने जवळपास ८० हजारांच्या घरात बेकायदा बांधकामे करणाºयांचे पितळ उघडे पडले आहे. एमएमआरडीकडे या गावांच्या नियोजनाची जबाबदारी असताना त्यांनी यावर कारवाई केली नाही आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेत दोन वर्षांपूर्वी ही गावे येऊनही पालिकेनेही या बांधकामांवर हातोडा न उगारल्याने नजिकच्या काळात या बांधकामांचा मुद्दा गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे.सोनारपाडा येथे राहणारे बाळाराम ठाकूर यांनी माहितीच्या अधिकारात कल्याण डोंबिवली महापालिकेने व एमएमआरडीएने किती बांधकामांना परवानगी दिली, त्याचा तपशील मागवला होता. त्यात पालिकेने २७, तर एमएमआरडीएने ३५ बांधकामांना परवानगी दिल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अधिकृत बांधकामांचा आकडा ६२ असल्याचे स्पष्ट झाले. २००७ पासून किती बांधकामांना परवानगी दिली, असा प्रश्नही ठाकूर यांनी विचारला होता. तेव्हा गावांचे नियोजन एमएमआरडीएकडे होते. तेव्हाचा आकडा ३५ असा आहे. ही २७ गावे १ जून २०१५ पासून पालिकेत समाविष्ट झाल्याने पालिकेची माहिती ही २०१५ पासूनच्या बांधकाम परवानगीवर आधारित आहे.एमएमआरडीएने परवानगी न देताही २७ गावात चाळी आणि चार, आठ, १२ मजली इमारती अशी हजारोंच्या संख्येने बेकायदा बांधकामे उभी राहिली. त्यांच्यावर प्राधिकरणाने हातोडाच उगारला नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.कारवाई कधी व कशी करणार याविषयी ठाकूर यांनी महापौर, आयुक्त, एमएमआरडीए, जिल्हाधिकाºयांकडे पत्रव्यवहार केला. त्यातील एकाही पत्राला यातील कुणीही उत्तर न दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
२७ गावांत ८० हजार अनधिकृत बांधकामे , माहिती अधिकारात उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 2:11 AM