मीरा रोड : मीरा रोडमध्ये एका बेकायदा कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांना कराची थकबाकी असल्याचे धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या सात जणांना शनिवारी ठाणे ग्रामीण पोलिसांनीअटक केली. आरोपी हे गिफ्टकार्ड वा आयट्यूनद्वारे डॉलरचे बीट कॉइनमध्ये व नंतर भारतीय चलनात पैसे वळते करत होते. त्यांचे संगणक, मोबाइल जप्त केले आहेत.
सहायक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मागील आठवड्यात भाजपा नगरसेवक मदन सिंग यांचा मुलगा ऋषी (२६) याला अटक केली होती. दिल्लीतील साथीदारांमार्फत मिळालेल्या डाटाच्या आधारे तो अमेरिकन नागरिकांना ठकवून त्यांच्या गिफ्टकार्ड, आयट्यूनद्वारे डॉलरमधून बीट कॉइन खरेदी करत असे. नंतर, भारतीय चलनात वळते करून स्वत:चे कमिशन घेऊन बाकी रक्कम दिल्लीतील साथीदारांना देत असे. दिल्लीतील त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला होता. तपासादरम्यान मीरा रोडच्या सेव्हन स्क्वेअर शाळेजवळील अमृता सदन इमारतीत बेकायदा कॉल सेंटर चालवली जात असल्याची माहिती मिळाली. शुक्रवारी मध्यरात्री कुलकर्णी व त्यांच्या पथकाने सदनिकेवर छापा घातला. तेथे चार कर्मचारी व चालक असे पाच जण आढळले. जुबेर अब्दुल कादर शेख (२६), राजू राठोड (२९), हर्ष काझी (२३), सौरभ झा (२९), विनोद नायर (२५), साबिओ गोन्सालवीस (४२), सिद्धार्थ पिल्ले (२२) अशी आरोपींची नावे आहेत. यातील जुबेर हा प्रमुख सूत्रधार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.अमेरिकन भाषेत उच्चारकॉल सेंटरचालकाने अमेरिकेतील नागरिकांची व्यक्तिगत माहिती, त्यांचा क्रमांक, कर व करभरणा आदींचा डाटा मिळवला होता. त्याआधारे आयपी कॉलिंग सॉफ्टवेअरद्वारे कॉल सेंटरमधून अमेरिकन उच्चारात नागरिकांना कॉल करून आपण कर विभागातून बोलत असल्याचे सांगायचे. तुमचा कर बाकी आहे वा चुकवला असल्याचे सांगून कारवाईची भीती दाखवायचे. संगणकात व्हायरस आहे, असे सांगून अॅण्टीव्हायरस आदी खरेदी करायला लावायचे.