ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपचे उमेदवार राजन विचारे यांनी तब्बल चार लाख १२ हजार १५१ एवढे विक्रमी मताधिक्य प्राप्त केल्याने देशात सर्वाधिक मताधिक्य प्राप्त करणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पंक्तीत जाऊन बसण्याचा बहुमान विचारे यांनी प्राप्त केला आहे. अर्थात गुजरात, हरियाणा तसेच राजस्थानच्या काही उमेदवारांनी सहा ते साडेसहा लाखांच्यापेक्षा जास्त मताधिक्य प्राप्त केले आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना गांधीनगर मतदारसंघातून पाच लाख ५७ हजार १४ एवढे मताधिक्य प्राप्त झाले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणसीतून चार लाख ७९ हजार ५४५ एवढे मताधिक्य प्राप्त झाले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना केरळमधील वायनाड मतदारसंघातून विजयी होताना चार लाख ३१ हजार ८७० असे मताधिक्य मिळाले. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांना चार लाख ५७ हजार एवढे मताधिक्य प्राप्त झाले. त्यामुळे विचारे हे देशात मोठे मताधिक्य प्राप्त करणाºया उमेदवारांच्या यादीत गेल्याची चर्चा ठाण्यातील वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर सुरू झाली आहे. अर्थात, मोदींचे मताधिक्य विचारे यांच्यापेक्षा जास्त असतानाही त्या संदेशात त्यांना सहाव्या स्थानी दाखवले आहे. प्रत्यक्षात विचारे हे मोदींपेक्षा मताधिक्यात खाली आहेत.
तसेच देशातील सर्वाधिक मताधिक्य मिळणाºया पाच खासदारांत भाजपच्याच उमेदवारांचा समावेश आहे. यात गुजरातच्या नवसारीचे खासदार सी.आर. पाटील यांना ६ लाख ७८ हजार ४४५ मताधिक्य मिळाले असून त्या खालोखाल हरियानाच्या कर्नालमधून संजय भाटिया यांना ६ लाख ५४ हजार२६९ तर राजस्थानच्या भिलवाडामधून सुभाषचंद्र बहोरिया यांनी ६ लाख ३७ हजार ९२० तर उत्तर प्रदेशातील फरिदाबादमधील कृष्ण पाल यांनी ६ लाख ३६ हजार ०३२ इतके प्रचंड मताधिक्य मिळविले आहे. म्हणजे विचारे यांचा नंबर देशात तुलनेनी खाली असला तरी महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य प्राप्त करणाऱ्यांमध्ये गोपाळ शेट्टी हे पहिल्या स्थानावर असतील, तर दुसºया स्थानावर राजन विचारे आहेत. तिसºया स्थानावर जळगावचे उन्मेष पाटील असून त्यांना चार लाख ११ हजार ६१७ एवढे मताधिक्य प्राप्त झाले आहे. विचारे यांच्या उमेदवारीला भाजपमधून अगोदर झालेला विरोध पाहता विचारे हे इतक्या विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, अशी शक्यता कुणालाही वाटली नव्हती. भाजप, शिवसेनेचे नेते व कार्यकर्तेही या मताधिक्याने अचंबित झाले आहेत. ठाण्यातील मतदारांनी मोदींना विजयी करण्याकरिता विचारे यांच्या पारड्यात मते टाकल्याचा दावा भाजपचे नेते खासगीत करत आहेत, तर शिवसैनिक हे शिवसेनेच्या संघटन कौशल्याचे यश असल्याचे सांगत आहेत.कल्याणला ठाण्याने मागे टाकलेकल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे निवडणूक लढवत होते. त्यांच्यासमोरील बाबाजी पाटील हे उमेदवार कमकुवत असल्याने डॉ. शिंदे यांचे मताधिक्य ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक असेल, अशी चर्चा पहिल्यापासून सुरू होती. खुद्द शिंदे यांनीही आपल्याला यावेळी मताधिक्याचे रेकॉर्ड करायचे आहे, असे पत्रकारांना सांगितले होते. मात्र, शिंदे हे तीन लाख ४४ हजार ३४३ एवढ्या मताधिक्याने विजयी झाले. शिंदे यांच्यापेक्षा ठाण्यातील विचारे यांना अधिक मताधिक्य लाभल्याने कल्याणवर ठाण्यातील मतदारांनी मात केली, अशी चर्चा आहे.