ठाणे : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे घरात बसून काय करायचे, असा अनेकांना प्रश्न पडला आहे; परंतु घरात बसलेल्यांसाठी निसर्गाने आपल्या जवळ येण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. आपल्या खिडकी, बाल्कनी अथवा सोसायटीच्या गच्चीवर जाऊन हिरवीगार झाडे बघताना त्यावर बसणाऱ्या सातभाई, सूर्यपक्षी, बुलबुल, चिरक, कोकीळ, अशा विविध पक्ष्यांची अदा आणि त्यांचा सुरेल आवाज कानात साठवून आपल्या मोबाइलमध्ये हे पक्षी अगदी सहज टिपता येऊ लागले आहेत. त्यामुळे घरात बसून कंटाळा आला असेल, तर जरूर आपले डोळे खिडकीच्या बाहेरील झाडांवर ठेवा म्हणजे निसर्गाचा हा अनोमल नजारा तुम्हाला रोजच्या रोज पाहता येणार असून, त्यातून मनात सुरू असलेला कोरोनाचा किलबिलाटदेखील कमी होण्यास मदत होणार आहे.
आपल्याला कावळा, चिमणी, कबुतर, पोपट, घार किंवा साळुंखी हे पक्षी ओळखता येतात किंवा हे दररोज कुठे ना कुठे आपल्या नजरेच्या टप्प्यात येतात. या पलीकडेही अनेक पक्षी आहेत सातभाई, कोकीळ, भारद्वाज, सूर्यपक्षी, चिरक, ब्राह्मणी मैना, भारद्वाज, असे किमान १५ ते २० पक्षी आपल्या सभोवताली असतात. या पक्ष्यांना बघण्यात विलक्षण आनंद मिळतो. सकाळी किंवा संध्याकाळच्या सत्रात हे पक्षी दिसून येतील. फक्त बघण्यासाठी बेरकी नजर असायला हवी. घरात दुर्बीण असेल तर उत्तमच, अशी माहिती पक्षी अभ्यासक हिमांशू टेंभेकर यांनी दिली.
ठाण्यात वड, पिंपळ, उंबर, अशी झाडे लावण्यास अनेक सोसायटींमध्ये परवानगी दिली जात नाही; परंतु निसर्गात हीच झाडे खूप महत्त्वाची आहेत. वैज्ञानिकदृष्ट्या ही झाडे उपयोगाची आहेत. जितके जुने झाड, त्या झाडावर अनेक लहान- मोठे पक्षी विसावा घेतात अथवा निवास करतात. या झाडाच्या कुठल्या ना कुठल्या फांदीवर वेगळा पक्षी हमखास बघायला मिळतो, अशी माहिती पक्षीनिरीक्षक चैतन्य किर यांनी दिली.