लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोगाने परीक्षा देण्याबाबत संधीची कमाल मर्यादा जाहीर केली आणि ठाण्यातील अनेक विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली. काहींना हा निर्णय योग्य वाटत असला तरी संधीची संख्या आणखी वाढवण्याची त्यांची अपेक्षा आहे.
आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ६ वेळा तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ९ वेळा परीक्षा देता येणार आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास अनेक विद्यार्थी बरीच वर्षे करत असतात. स्पर्धा परीक्षेत चांगला रँक मिळवणे हेच त्यांचे एकमेव लक्ष्य असते. त्यासाठी ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी मुंबई, ठाणे, पुणेसारख्या शहरात येऊन तयारी करतात. काही विद्यार्थी पार्ट टाइम नोकरी करून परीक्षा देतात. एमपीएससीच्या परीक्षेसोबतच काही विद्यार्थी इतरही विविध शासकीय, बॅंकिंगच्या परीक्षा देतात. याचा अनुभव घेतात. मात्र आयोगाच्या या निर्णयानंतर विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.
अशाप्रकारे होईल संधीची गणना एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एक पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजली जाईल.
संधीवर मर्यादा घालणे अयोग्यमी आतापर्यंत चार वेळा एमपीएससीची परीक्षा दिली आहे. मात्र अपेक्षित गुण मिळाले नाही म्हणून दरवेळी अधिकाधिक तयारी करून परीक्षा देतो. परीक्षाही दिवसेंदिवस कठीण होत आहे. त्यामुळे ठरावीक संधीत परीक्षेत चांगला रॅंक मिळवणे कठीण आहे. संधीवर मर्यादा घालणे हे अयोग्य आहे. दिग्विजय रांजणे, उमेदवार
स्पर्धा पण वाढते आहेमी गेली दोन वर्षे एमपीएससीची तयारी करतो आहे. मात्र परीक्षा एकदाच दिली. परीक्षा देणार्यांची संख्याही वाढतेय आणि स्पर्धा पण वाढतेय. परीक्षेसाठी संधीची मर्यादा घातली ते एखादवेळ योग्य वाटते. पण साधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी संधी अजून द्यायला हव्यात. रमण यमवारे, उमेदवार
संधींची संख्या काहीशी वाढवावीएमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या वाढली आहे. त्यामुळे कितीही चांगला अभ्यास केला तरी अपेक्षित नंबर मिळवणे जरा कठीण झाले आहे. त्यामुळे संधीबाबत मर्यादा घातल्या हे काही अंशी योग्य असले तरी त्या संधीची संख्या वाढली पाहिजे. रामेश्वरी पाटकर, उमेदवार
सर्वसाधारण प्रवर्गाचे जास्त नुकसानसंधीची संख्याही कमी आहे. त्यात पूर्व परीक्षेत भाग घेणे किंवा परीक्षेच्या टप्प्यावर अपात्र ठरले किंवा काही कारणाने रद्द झाले तरी ती संधी म्हणून गणली जाणार असेल तर ते चुकीचेच आहे. अशाने सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे तर मोठे नुकसान होणार आहे. याचा फेरविचार व्हावा. मनाक्षी भोसले, उमेदवार