ठाणे : ठाण्यातील अभिनय कट्ट्याच्या ३७० व्या कट्ट्याचे वैशिष्ट्य होते सुप्रसिद्ध कास्टिंग डिरेक्टर रोहन मापुस्कर यांची मुलाखत. ' थ्री - इडीअट्स" , "फेरारी की सवारी", "लगे राहो मुन्नाभाई", आगामी चित्रपट "ठाकरे", "पानिपत" व "सचिन अ बिलियन ड्रीम्स" या हिंदी चित्रपटांचे तसेच "व्हेंटीलेटर" व १४ मराठी चित्रपटांचे कास्टिंग रोहन मापुस्कर यांनी केले आहे. अभिनय कट्ट्यावर अभिनय बोलताना रोहन यांनी प्रेक्षकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि कलाकारांना मार्गदर्शन केले.
प्रथेप्रमाणे कट्ट्याची सुरुवात प्रार्थनेने झाली.त्यानंतर एकपात्री, द्विपात्री सादर झाल्या.ज्यामध्ये अभिषेक सावळकर याने “अश्वत्थामा”,आदित्य नाकती याने "ती",पियुष भोंडे याने “शोहोरत”, त्यासोबत अनिल राजपूत आणि कदिर शेख या कलाकारांनीदेखील एकपात्री सादर केल्या. यानंतर संकेत देशपांडे व वैभव चव्हाण यांनी “अकबर-बिरबल”आणि गणेश हिंदुराव व निलेश भगवान यांनी “आबुराव-बाबुराव” या विनोदी द्विपात्री सादर करून प्रेक्षकांना निखळ मनोरंजनाचा आस्वाद करून दिला. त्यानंतर थेट मुलाखतीला सुरुवात झाली. अभिनय कट्ट्याचे सर्वेसर्वा किरण नाकती यांनी रोहन मापुस्कर यांचे अभिनय कट्ट्यावर स्वागत केले.
कास्टिंग डिरेक्शन म्हणजे नेमकं काय? हा प्रश्न बहुतेक जणांना पडलेला असतो आणि याच बद्दलची माहिती रोहन यांनी साऱ्यांना दिली. कास्टिंग डिरेक्शन हे देखील नवीन क्षेत्र बनलंय ज्यामध्ये आपण आपले करिअर करू शकता.अशी माहिती रोहन यांनी यावेळी दिली. तसेच कास्टिंग डिरेक्टर्स किंवा प्रॉडक्शन हाउसेस ना अँप्रोच व्हायला लाजू नका. खरा कास्टिंग डिरेक्टर अथवा कास्टिंगच काम करणारी व्यक्ती कशी ओळखावी, याबद्दल माहिती दिली. त्यांची स्वतःची कास्टिंगची पद्धत त्यांनी सांगितली. ऑडिशनला जाताना करायची तयारी,ऑडिशनला गेल्यावर ऑडिशन देताना पाळावयाचे नियम, विविध भाषांचा अभ्यास, आजूबाजूच्या व्यक्तिरेखांचा अभ्यास अशा विविध गोष्टींचे मार्गदर्शन त्यांनी यावेळी कलाकारांना केले.तसेच विविध चित्रपटांच्या कास्टिंगच्या वेळचे अनुभव व गंमती सांगितल्या. राजेश मापुस्कर तसेच राजकुमार हिराणी व विधु विनोद चोपडा यांचा प्रभाव व त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला. सादरीकरण केलेल्या कलाकारांचे कौतुक केले व महत्वाच्या सूचनाही केल्या. शेवटी अभिनय कट्ट्याचे भरभरून कौतुक केले.अभिनय कट्ट्याच्या कलाकारांना नेहमीच प्रथम पसंती दिली जाईल अस मत त्यांनी व्यक्त केले. तसेच या चळवळीशी आपणही जोडले गेल्याची भावना व्यक्त केली. काही मान्यवर कलाकारांकडून कट्ट्याची माहिती मिळाली होती. परंतु आज प्रत्यक्ष हे सर्व काम व इतके कलाकार बघून आनंद झाला. ही चळवळ अशीच इतरही ठिकाणी वाढावी यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची तयारी दर्शवली.कट्ट्याची सांगता झाली.या संपूर्ण कट्ट्याचे सुत्रसंचालन संकेत देशपांडे यांनी केले.