ठाणे : नालेसफाईच्या कामाला प्रत्यक्ष शुक्रवारपासून सुरुवात झाली. पण, त्याआधीच विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी शहरातील नाल्यांचा पाहणी दौरा केला होता. त्यानंतर १० टक्केच नालेसफाई झाल्याचा दावा त्यांनी केला होता. आता महापालिकेने त्यांची पोलखोल केल्यानंतर नालेसफाईची कामे सुरू न झाल्याने आपण हा दौरा केल्याचे घूमजाव विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी केले आहे.
विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी दोन दिवसांपूर्वी ठाणे शहरातील नालेसफाईचा पाहणी दौरा केला. या दौऱ्यानंतर पालिकेने स्पष्टीकरण देत नालेसफाईच्या कामाला शुक्रवारपासून सुरुवात झाल्याचे सांगितले. त्यामुळे नालेसफाई सुरू होण्यापूर्वीच पठाण यांनी दौरा केल्याचेही पालिकेने स्पष्ट केले होते. तसेच, शानू पठाण यांच्या या कृतीवर राष्ट्रवादीच्या सोशल मीडियाच्या ग्रुपवरही टीका झाली होती. चुकीच्या पद्धतीने हा दौरा केल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली. त्यामुळे आता शानू पठाण यांनी एक पाऊल मागे येत आपण नालेसफाईची कामे सुरू न झाल्यानेच हा दौरा केल्याचा दावा केला आहे. दरम्यान, दरवर्षी नालेसफाईमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असतो. हा भ्रष्टाचार आपण डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली उघड करणार आहोत, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.