मीरा रोड - मीरा रोडच्या श्रीकांत जिचकर चौकजवळील मैदानात २१ व २२ मार्च रोजी बिहार दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, मराठी एकीकरण समितीने मात्र सदर कार्यक्रमास विरोध करून कोणत्याही परवानग्या देऊ नका, अशी मागणी केली आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मीरा रोड पोलीस आदींना समितीच्या वतीने अध्यक्ष गोवर्धन देशमुख, कार्याध्यक्ष प्रदीप सामंत, मीरा भाईंदर अध्यक्ष सचिन घरत यांनी निवेदन दिले आहे.या बिहार दिनाच्या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार, अशी जाहिरातबाजी सुरू आहे. बिहार राज्य दिवस साजरा करण्याशी महाराष्ट्र राज्याचा काही संबंध नाही. अशा कार्यक्रमातून भडकावणारी व तेढ निर्माण करणारी भाषणे केली जातात. अश्लील व अपु-या कपड्यांमध्ये नाचगाणी होतात. धागडधिंगा घातला जातो. जेणेकरून राज्याच्या संस्कृती व युवा पिढीवर वाईट परिणाम होतो. वाहतुकीची कोंडी होते. डिजे वापरला जातो तसेच ध्वनिप्रदूषण केले जाते. पोलिसांवर बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण पडतो.त्यातच सध्या कोरोना संसर्गामुळे शहरातील सभागृह, व्यायामशाळा आदी बंद केली असून, या बिहार दिनाच्या कार्याक्रमास सुद्धा कोणतीच परवानगी देऊ नये, अशी मागणी समितीने केली आहे. राज्यात मराठी भाषा दिवस वा महाराष्ट्र दिन असतो. त्यावेळी मात्र ही मंडळी कार्यक्रम करत नाहीत. कारण त्यांना मराठी व महाराष्ट्राशी काही सोयरसुतक नसून केवळ बक्कळ पैसा कमावून आपली संपत्ती वाढवायची आणि राजकीय ताकद अशा कार्यक्रमातून दाखवायची असल्याने अशा कार्यक्रमांचा समिती विरोध करेल, असा इशारा देण्यात आला आहे.
बिहार दिनाच्या कार्यक्रमास मराठी एकीकरण समितीचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 9:46 AM