लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी प्रस्तावित ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्प मार्गाबाबत भिवंडीतील जवळपास एक हजार नागरिकांनी विरोध दर्शविला असून, पाच हजार नागरिकांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. २१ जानेवारी ते ६ फेब्रुवारीदरम्यान महानगरपालिकेने नागरिकांकडून हरकती आणि सूचना बोलावल्या होत्या.
भिवंडी शहरातील नागरिकांना दळणवळणासाठी सोयीचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने मेट्रो रेल्वे प्रकल्प भिवंडीत राबविण्याचा निर्धार केला असून, सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील दळणवळणाच्या दृष्टीने मेट्रो रेल्वे प्रकल्प क्र. ५ महत्त्वाचा राहणार असून, त्याच्या मार्गाला एमएमआरडीएने गती दिली आहे. ठाण्यातील कापूरबावडी येथून सुरू होणारा मेट्रो रेल्वेमार्ग बाळकुम, कशेळी, काल्हेर, पुर्णा, अंंजूरफाटा, धामणकरनाका, राजीव गांधी चौकापासून कल्याण रोडकडे वळण घेऊन पुढे टेमघर, रांजनोली, गोवेगाव, दुर्गाडी ते कल्याण एपीएमसीपर्यंत नेण्यात येणार आहे. हा मार्ग २४ किलोमीटर लांबीचा असून, एमएमआरडीएच्या माध्यमातून कापूरबावडी, कशेळी, काल्हेर, पुर्णा, कोपर ते राहनाळपर्यंत मेट्रोचे काम सुरू झाले आहे.
भिवंडीतील कल्याण रोडच्या दुहेरी बाजूला राहणारे नागरिक आणि व्यापाऱ्यांनी कल्याण रोडने जाणाºया मेट्रोला विरोध दर्शविला. ही बाब लक्षात येताच एमएमआरडीएच्या सूचनेवरून भिवंडी पालिका प्रशासनाने मेट्रोबाधित नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यासाठी सुमारे सहा हजार प्रकल्पबाधित रहिवाशांना नोटिसा दिल्या होत्या. या नोटिसांवर आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या उपस्थितीत पालिकेच्या दालनात लेखी हरकती व सूचना अर्जांवर सुनावणी घेण्यात आली. यावेळी एक हजार ४० लोकांनी हा मेट्रो प्रकल्प कल्याण रोडऐवजी वंजारपट्टीनाक्याकडून नेण्याची सूचना केली. हा मेट्रोमार्ग कल्याण रोड येथून नेल्यास तीव्र आंदोलन करण्याची भूमिका कल्याण रोड व्यापारी संघर्ष समितीने घेतली आहे. या मेट्रोमार्ग प्रकल्पात काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे. मात्र, बहुसंख्य नागरिकांनी मेट्रो प्रकल्पासाठी आपली जागा देण्यास सहमती दर्शवली असून, जागेच्या मोबदल्यात रोख रक्कम अथवा अन्यत्र जागा देण्याचीही मागणी केल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून मिळाली आहे.गोपनीय अहवाल शासनाकडे : मेट्रोच्या मार्गाबाबत आलेल्या हरकती आणि सूचनांचा गोपनीय अहवाल पालिका प्रशासनाने शासनाकडे पाठवला आहे. येत्या महिनाभरात या मेट्रोमार्गाबाबत शासनस्तरावर निर्णय होण्याची शक्यता आहे. आयुक्तांच्या दालनात झालेल्या हरकती आणि सूचनांच्या सुनावणीदरम्यान कल्याण रोड परिसरातील काही रहिवासी तथा व्यापाऱ्यांनीही मेट्रोच्या मार्गास अनुकूलता दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली.