ठाणे : महासभेत अधिकाऱ्यांना टार्गेट केले जात असल्याच्या मुद्यावरून व्यथित झालेल्या अधिकाऱ्यांनी प्रसंगी राजीनामे देण्याची तयारी केली असतानाच, शिवसेनेने मात्र या नाराजीचे कापर भाजपा आणि राष्ट्रवादीवर फोडले आहे. सत्ताधारी शिवसेनेवर आयुक्तांसह अधिकारी नाराज असले तरी शिवसेनेने यू टर्न घेत आम्ही महासभेत प्रशासनाविरोधात बोललोच नसल्याचा दावा केला आहे. आम्ही विकासकामांबाबत नेहमी प्रशासनाच्या बाजूनेच होतो आणि राहणार असल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांच्या या भूमिकेमुळे शिवसेना विरुद्ध भाजपा आणि राष्ट्रवादी असा सामना रंगण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात प्रशासनाने सुचवलेली करवाढ सर्वपक्षीय नगरसेवकांनी फेटाळून लावल्याने उत्पन्नात ४७० कोटींचा खड्डा पडणार आहे. त्यामुळे नव्याने एकही विकासकाम हाती घेता येणार नाही. त्यामुळे पालिकेचा गाडा पुन्हा खोलात रुतण्याची चिन्हे आहेत. त्यावर कसा मार्ग काढता येईल, यावर चर्चा करण्यासाठी आयुक्तांनी मंगळवारी बैठक घेतली. त्यात मूळ मुद्यावर चर्चा करताकरता अनेक अधिकाऱ्यांनी महासभेत झालेल्या टीकेचा मुद्दा उपस्थित केला. उत्पन्न वाढवण्यासाठी नगरसेवक करवाढ करू देत नाहीत, थकबाकी वसूल करायची ठरवली तर ती रोखतात, दबाव आणतात, अशा स्थितीत कामे करायची कशी, हा त्यांचा प्रश्न होता. त्यानंतरही शेलक्या शब्दांत आमचा उद्धार होणार असेल, तर आम्ही राजीनामे देतो. अशी नोकरीच करायला नको, अशा तीव्र शब्दांत त्यांनी भावना मांडल्या. या भावना मांडत असताना अनेकांनी सत्ताधारी शिवसेनेचे नाव न घेता, त्यांच्यावरही टीका केली आहे. एकीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठाण्यात येऊन पालिकेने केलेल्या कामांचे कौतुक करतात आणि दुसरीकडे त्यांचेच नगरसेवक आमच्यावर टीका करतात, असाही काहीसा सूर या बैठकीत दिसून आला. परंतु, या अधिकाऱ्यांनी सर्वपक्षीयांवरदेखील नाराजी व्यक्त केली आहे. त्यातही सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने आपल्यावरील आरोपांचे वृत्त सपशेल फेटाळून लावले आणि महासभेतील उद्धाराबद्दल भाजपा आणि राष्ट्रवादीला दोषी धरले. (प्रतिनिधी) १ अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली नाराजी शिवसेनेच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसून आले आहे. आधीच अर्थसंकल्पीय महासभेत शिवसेनेच्या अनेक नगरसेवकांनी आयुक्तांचे मन राखण्यासाठी आयुक्तांच्या कामांचे कौतुक केले. त्यामुळे काही नगरसेकांना हे कौतुकही खटकले होते. आयुक्तांच्या कौतुक सोहळ्याने व्यथित झालेल्या शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नगरसेवकाने आता आयुक्तांना थेट पद्मभूषण पुरस्कारच द्या, अशी बोचरी टीकादेखील केली होती. २या बजेटच्या चर्चेनंतर अधिकारी व्यथित झाल्यानंतर याचे खापर आता शिवसेनेवर फोडले जात असल्याने शिवसेनेनेदेखील सावध भूमिका घेऊन महासभेत आम्ही अधिकाऱ्यांच्या किंवा आयुक्तांच्या विरोधात काही बोललोच नसल्याचा दावा केला आहे. उलट, आम्ही नेहमी त्यांच्या कामांचे कौतुकच केले असल्याचेही सांगितले आहे. ३ते सांगत असताना महासभेत शिवसेनेने नाही तर, भाजपा आणि राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवकांनीच प्रशासनावर आणि अधिकाऱ्यांवर टीका केली असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेने घेतलेल्या या यू टर्नमुळे या प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता असून भाजपा आणि राष्ट्रवादी आता याबाबत काय भूमिका घेणार, हे आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राष्ट्रवादी, भाजपाचाच आयुक्तांना विरोध
By admin | Published: May 04, 2017 6:00 AM