ठाणे : महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम सुधारणा पत्र २०१८ या नवीन कायद्यान्वये खासगी शाळांना फीवाढीसंदर्भात एकतर्फी अधिकार मिळणार आहे. यामुळे खासगी शाळांचे शिक्षण आणखी महाग होणार असल्याने, त्याचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी शेकडो पालकांनी महापालिका मुख्यालयासमोर मूक मोर्चा काढला. राज्य शासनाने हा प्रस्ताव मागे घेऊन पालकांना न्याय देणारा कायदा करावा, अशी मागणी करून तसे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.या वेळी पालकांनी हाताला काळ्या फिती बांधून हातात निषेधाचे फलक घेऊन शांततेत मोर्चा काढून, ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन आपले म्हणणे राज्य सरकारपर्यंत पोहोचवावे, अशी विनंती केली. नव्या प्रस्तावित कायद्यानुसार, २५ टक्के पालक एकत्रित येऊन विरोध केला पाहिजे. फी वेळेवर दिली नाही, तर लेट फी, तसेच व्याज लावणार. फी रेग्युलेशन कमिटीवर शाळेचेच प्रतिनिधी असतील. पालकांचा सहभाग असणार नाही. शाळेची फी कोणत्या कारणासाठी घेऊ शकता (जिम, इंटरनेटसेवा, साफसफाई, शौचालय सुविधा अशा प्रकारे कोणतीही कारणे), पहिली ते पाचवी आणि सहावी ते दहावी इयत्तांतील फीमध्ये प्रचंड तफावत असणार आहे. त्यामुळे पालकांचे कंबरडे मोडणार आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात हे बिल मंजुरीसाठी ठेवले जाणार आहे. ते रद्द करून पालकांच्या हिताचे बिल आणावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. आज विरोध केला नाही, तर उद्याच्या पिढीला शिकणे अवघड होणार असल्यानेच, आतापासून हे आंदोलन करण्यात येत असल्याचेही पालकांनी सांगितले.>राज्य शासनाने हे बिल रद्द करून पालकांना दिलासा द्यावा, अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र होईल.- सुशील बर्डे, पालक>खासगी शाळा वारंवार फीवाढ करत आहेत. त्यात राज्य शासनाने आता जे बिल आणले आहे, त्यामुळे खासगी शाळांवाले अव्वाच्या सव्वा फी वसूल करणार आहेत. त्यामुळेच याला आतापासूनच आम्ही विरोध करत आहोत. - नीरज पाटील, पालक
नव्या शैक्षणिक संस्था अधिनियमास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 4:20 AM