भिवंडी : येथे आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात नवविवाहित जोडप्यांनी दंडाला एनआरसी व सीएए कायद्याच्या निषेधाचे बॅजेस बांधून शुक्रवारी विरोध केला.
देशात ठिकठिकाणी या कायद्यांविरोधात निदर्शने सुरू आहेत. भिवंडीतही मागील काही दिवसांपासून विविध संघटनांच्या माध्यमातून या कायद्यांविरोधात आंदोलने होत आहेत. सामूहिक विवाह सोहळ्यात नवविवाहित जोडप्यांनी अनोख्या पद्धतीने विरोध दर्शविला.भिवंडीतील लाकूड मार्केट, नवी वस्ती येथे शुक्र वारी हुसैनी एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष दिन मोहम्मद शाह मोहम्मद खान यांच्या वतीने मुस्लिम समाजातील आर्थिक दुर्बल घटकांमधील युवकयुवतींसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षी या सामूहिक विवाह सोहळ्याचे हे नववे वर्ष असून या सामूहिक विवाह सोहळ्यात एकूण २५ जोडप्यांचे विवाह संपन्न झाले. या जोडप्यांना संस्थेच्या वतीने संसारोपयोगी साहित्य देण्यात आले.