डोंबिवली- सागाव येथे सात मजली बेकायदा इमारत पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने कल्याण डोंबिवली महापालिकेस दिले आहे. ही इमारत पाडण्यासाठी महापालिकेचे कारवाई पथक पोहचले असता कारवाईस इमारतीमधील रहिवासियांसह भाजपच्या स्थानिक नेत्यांनी जोरदार विरोध केला. कारवाईकरीता आणलेल्या जेसीबीसमोरच त्यांनी लोटांगण घातले. कारवाईस होणारा जोरदार विरोध पाहता अधिकारी वर्गाने मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली.
महापालिकेचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप हे सागाव येथील रागाई इमारतीवर कारवाई करण्यासाठी पथकासह पोहचले. जेसीबी आतमध्ये कारवाईसाठी जाणार त्या आधीच भाजप पदाधिकारी संदीप माळी, नंदू परब आदींनी जेसीबीसमोर लोटांगण घातले. नागरीकांवर अत्याचार होऊ देणार नाही. भर पावसात नागरीक जाणार कुठे असा सवाल उपस्थित केला. जवळपास पाच तास पिडीत रहिवासी आणि भाजप कार्यकर्ते जेसीबीसमोर ठाण मांडून बसले होते. अखेर अधिकारी जगताप यांनी मानपाडा पोलिस ठाणे गाठले.
पोलिसानी रहिवासियांना ताब्यात घेतले. या प्रकरणी मानपाडा पोलिस रहिवासियांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली. जेव्हा ही इमारत उभी राहिली. तेव्हा महापालिकेचे अधिकारी झोपले होते का ? असा संतप्त सवाल नागरीकांनी उपस्थित केला आहे. तसेच ज्या नागरीकांची फसवणूक झाली आहे. त्यांच्या विरोधात काय कारवाई केली जाणार ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.