कल्याण, दि.14 - माय मराठी ही महाराष्ट्राची भाषा असली तरी हिंदी ही राजभाषा आहे. राजभाषेची भगिनी मराठी भाषा संबोधली जाते. मराठी भाषेला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला नाही. तोच दुजाभाव आजर्पयतच्या सत्ताधा-यांनी हिंदीच्या बाबतीत केला आहे. हिंदी भाषेला आपण राजभाषा म्हणतो. पण तिला अद्याप राजभाषेचा दर्जा दिलेला नाही. हिंदीला राजभाषेचा दर्जा दिला जाऊ नये यासाठी दाक्षिणात्यांचा विरोध आहे,अशी खंत मुंबई हिंदी भाषा सभेचे सदस्य जगदीश पाटील यांनी येथे व्यक्त केली. अखिल हिंदी भाषी संस्थेतर्फे हिंदी दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मता आणि सर्वधर्मसमभावचा संदेश देत रॅली काढण्यात आली होती.या वेळी पाटील यांनी उपरोक्त खंत व्यक्त केली. पाटील म्हणाले की, आज हिंदी दिन आहे. त्यामुळे किमान आजच्या दिवशी तरी हिंदी भाषा बोलली पाहिजे. मातृभाषा मराठी असली तरी हिंदीलाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे. हिंदी भाषेच्या वेगवेगळ्य़ा विषयांच्या परिक्षा होत असतात. त्या परिक्षा देऊन विद्याथ्र्यानी आपले ज्ञान वाढविले पाहिजे. शाळेमध्ये हिंदी दिनानिमित्त निबंध आणि वकतृत्व स्पर्धा घेतल्या पाहिजेत. हिंदी भाषेला आपण राजभाषा म्हणत असलो तरी तिला अजून ही राजभाषेचा दर्जा मिळालेले नाही. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यास दाक्षिणात्य लोक विरोध करीत आहे. मातृभाषेला स्वीकारणो जसे गरजेचे आहे. तसेच देशाची प्रमाणित भाषा असावी. संपूर्ण भारतातून हिंदीला राजभाषाचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न सुरू आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. शाळा कोणत्याही माध्यमाची असली तरी अभ्यासक्रमात हिंदी विषय हा असतोच. हिंदीविषयी गोडी निर्माण व्हावी आणि सर्वधर्मसमभाव मुलांमध्ये रूजावा या उद्देशाने या रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत पाचवी ते नववीचे 300 विद्यार्थी सहभागी झाले होते. मुस्लीम, हिंदू, बौदध, पंजाबी, मराठी, गुजराती भाषिकांची वेशभूषा विद्याथ्र्यानी परिधान केली होती. शिवाजी चौकातून रॅलीला प्रारंभ झाला. त्यानंतर सहजानंद चौक, आग्रा रोड, लालचौकी, शारदा मंदिर या मार्गी रॅली गेली. शारदा मंदिरात रॅलीचे सभेत रूपांतर झाले. यावेळी मानवअधिकार आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष सिराज हुड्डा, हिंदी लेखक ओमप्रकाश पांण्डेय आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष संतोष गुप्ता, सचिव संतोष पाठक, आर. डी. पाटील, शारदा मंदिर स्कूलचे सहाय्यक शिक्षक उमेश काळे, सरस्वती विद्यालयाचे पर्यवेक्षक अंकुर आहेर यांनी मेहनत घेतली.
हिंदीला राजभाषेचा दर्जा देण्यास दाक्षिणात्यांचा विरोध - जगदीश पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 8:46 PM